<
रॉक ऑन ग्रुप, शनिपेठ पोलीस ठाणे, युथ फॉर हेल्प फाउंडेशनतर्फे जळगावात रंगला भव्य ईद मिलन सोहळा
जळगाव(प्रतिनिधी) – गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भर पावसात दमदार भाषण करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली छाप मतदारांवर सोडली होती. जळगावात देखील तसाच कित्ता गिरवीत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी प्रभावी भाषण करीत तरुणाईच्या मनात एकात्मतेचे बीज रोवले. पाऊस सुरु असतांना देखील एक व्यक्ती कार्यक्रम सोडून न जाता पोलीस अधीक्षकांचे भाषण मन लावून ऐकत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम नक्कीच दिसेल असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.
जळगाव शहरातील रॉक ऑन ग्रुप आणि युथ फॉर हेल्प फाउंडेशनतर्फे दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जात असते. यंदा इफ्तार पार्टी ऐवजी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या सहकार्याने भव्य ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्व.गंगुबाई यादव शाळेच्या बाहेर रमजान ईद आणि अक्षय तृतीयाचे औचित्य साधत सर्वधर्मियांना एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजूमामा भोळे हे होते. प्रसंगी व्यासपीठावर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, परीरक्षावधीन पोलीस अधिकारी श्री.कुलकर्णी, आप्पासो पवार, माजी उपमहापौर करीम सालार, हाजी वहाब मलीक, राष्ट्रवादी काँग्रेसचे एजाज मलीक, नगरसेवक चेतन सनकत, मुकुंदा सोनवणे, मौलाना अब्दुल अहद मिल्ली प्रसिद्ध वक्ते सोहेल अमीर, हिंदू-मुस्लीम सदभावना एकात्मता मंचचे प्रदेशाध्यक्ष अमजद पठाण, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर शेळके, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड, पियुष कोल्हे, निलेश तायडे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन करताना अयाज मोहसीन यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि रूपरेषा मांडली. रमजान ईदच्या दिवशी सायंकाळी पाऊस सुरु झाल्याने कार्यक्रम होणार की नाही अशी शंका असताना उपस्थितांनी केलेल्या गर्दीमुळे खुर्ची आणि परिसर देखील कमी पडत होता. मौलाना अब्दुल अहद मिल्ली यांनी कुरान पठन केल्यावर पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीला आ.राजूमामा भोळे यांनी, सर्व समाजात एकात्मतेची भावना असल्यानेच आपण सर्व सणोत्सव आनंदात साजरे करू शकतो. आजचेच उदाहरण घेतल्यास आज रमजान ईद, अक्षय तृतीया, भगवान परशुराम जयंती, महात्मा बसवेश्वर महाराज जयंती असे चारही उत्सव शांततेत आणि आनंदात पार पडत आहेत. भारत आपली माता असून त्याच मातेने आपल्याला जोडून ठेवले आहे. उद्याचा भारत घडवायचा असेल तर राग, रोष, जातीय तेढ बाजूला ठेवत सर्वांनी एकत्रित पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
प्रसिद्ध वक्ते सोहेल अमीर यांनी, देशात कुठे काठ्या, तलवारी, दगड वाटप केले जातात तर आज याठिकाणी शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम होतो आहे हि खूप सकारात्मक बाब आहे. समाजात गुन्हेगारी कमी करायची असेल तर केवळ वर्दीचा धाक पुरेसा नाही तर लोकांच्या मनावर राज्य करायला हवे. आज आपण रोजा ठेवतो तर आपण विचार करतो की अल्लाह आपल्यावर नजर ठेवतो, पण वर्षभर अल्लाह कुठे गायब होतो का? नाही. वर्षभरात तुम्ही जेव्हा कधी कोणतेही चुकीचे काम करीत असतात तेव्हा कोणत्याही सीसीटीव्हीची नजर तुमच्यावर नसेल तरीही अल्लाहची तुमच्यावर नजर असते. आजकाल देशात सर्वाधिक चर्चेतील विषय असेल तर तो स्वताच्या देशभक्तीचा पुरावा देणे. लोकांच्या घरात काय शिजतंय हे पाहण्यापेक्षा रस्तावरील एखादा दगड जरी बाजूला केला तर तो माझ्या मते देशभक्ती असेल. देशातील गुन्हेगारी रोखण्यासाठी जेव्हा प्रत्येक मनुष्य आपल्यावर ईश्वर, अल्लाहची नजर आहे असा विचार करेल तेव्हा गुन्हेगार आपोआप संपेल, असे सोहेल अमीर यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी सांगितले की, आमच्या दक्षिण भाषेत जेव्हा सामाजिक क्रांती झाली त्याचा फायदा म्हणजे आज आम्ही आमच्या नावाच्या मागे जात घेऊन पुढे जात नाही. आम्ही अगोदर वडिलांचे नाव लावतो नंतर स्वताचे नाव असते. जसे माझ्या वडिलांचे नाव एम म्हणजे मेघनाथन आणि नंतर माझे नाव असे आहे. तुमच्याकडे सर्वप्रथम जात विचारली जाते आणि त्यावर लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन ठरतो.
मुद्दाम खाकी नव्हे साध्या पोशाखात आलो..
आज मी तुम्हाला मार्गदर्शन करण्याच्या उद्देशान नाही आलो तर एक मैत्रीपूर्ण चर्चा करण्यासाठी आली. आज ईदची पार्टी असल्याने मी खाकी पोशाख परिधान घालून नाही तर साध्या कपड्यात आलो. जात, धर्म सर्व सोडून आम्ही जेव्हा कोणत्याही सण, उत्सवात कर्तव्य बजावत असतो तेव्हा जेष्ठ आणि समाजातील मान्यवर आम्हाला भेटतात तर त्यांची वागणूक सन्मानजनक असते पण १५ ते ३० वयोगटातील तरुणाई आमच्याशी जुळवून न घेता आम्ही का इथं आलो अशा नजरेने बघतात. अरे बाबांनो आम्ही तुमच्यासाठी तर याठिकाणी आलो. जोपर्यंत तुम्ही काही चुकत नाही तोवर आमच्याकडे संशयाच्या नजरेने पाहण्याची गरज नाही, असे एम.राजकुमार म्हणाले.
असहिष्णुता पसरविणारे घरी बसतात आणि..
देशात कधीही काहीही जातीय तेढ निर्माण झाला तर सर्वात पुढे तरुण मुले असतात. आजकाल बऱ्याच ठिकाणी असे वाद झाले. एखाद्या महापुरुषांची विटंबना करण्याची दुर्बुद्धी कधीही सद्सद्विवेक बुद्धी असलेल्या तरुणांना सुचणार नाही. पुणे, मुंबईत नोकरी करणारा माझा ४० हजारांचा पगार ५० हजार कधी होईल याचाच विचार करत असतो आणि इकडे कुणाच्या तरी सांगण्यावरून वाद घालायला तरुणाई पुढे सरसावते. कधीही कुठे जातीय तेढ निर्माण झाला तर मूळ वाद घालणारेच अगोदर पळ काढतात. भावना भडकवणारे तर घरी बसलेले असतात, त्यामुळे आपले हित कशात आहे हे तरुणांनी ओळखणे आवश्यक असल्याचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार म्हणाले.
लहानपणापासून संयम बाळगणारे आक्रमक होऊच शकत नाही
सध्या काही चुकीच्या पद्धती आपल्याला पाहायला मिळत आहे. एखाद्याने आपल्या धार्मिक स्थळाजवळ वाद्य वाजविले, झेंडे फडकावले, घोषणा दिल्या तर आपले दैव, धर्म धोक्यात येतोय असा दुसऱ्यांचा समज होते आणि त्यातून वाद होतात. बॅंनरबाजी आणि झेंडे लावण्याच्या स्पर्धेने आपल्याला वेडे केले आहे. एखाद्याचा झेंडा खाली असेल तर माझा त्याच्या आणखी वर असावा. एखादे बँनर फाटले तर लागलीच आंदोलन पुकारले जाते. फलक फाटले तर दुसरे लावा वाद घालून काय मिळणार असते. रमजानमध्ये लहान-लहान मुलांना रोजे धरताना मी बघितले आहे. लहानपणापासून संयम बाळगण्याची शिकवण मिळणारे आक्रमक होऊच शकत नाही, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केले.
ईद मिलन कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे माजी उपमहापौर करीम सालार, नगरसेवक चेतन सनकत, एजाज मलीक यांनी देखील आपले विचार कार्यक्रमात मांडले. पाऊस आणि वारा सुरु असताना देखील सर्व नागरिक आपापल्या जागेवर थांबून होते. आभार प्रदर्शन करताना युथ फॉर हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष चेतन वाणी यांनी, एका पावसाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवी उभारी दिली होती, आजच्या पावसात पोलीस अधिक्षकांनी केलेल्या भाषणातून नक्कीच तरुणाई सकारात्मक विचारच पुढे घेऊन जाईल यात शंका नाही. आज पहिल्यांदाच आयोजित ईद मिलन कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षी नक्कीच यापेक्षा आणखी चांगला कार्यक्रम राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
ईद मिलन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांना शिरखुर्मा वाटप करण्यात आला. कार्यक्रमासाठी युथ फॉर हेल्प फाउंडेशनचे जकी अहमद, वसीम खान, रॉक ऑंन ग्रुपचे अध्यक्ष इम्रान खान, अज्जू खान, जावेद खान, शाहरुख खान, तौसीफ खान, इसरार खान, फिरोज शेख, नजर शेख, फहीम खान, वहीद खान, शाहीद खान, इस्माईल शेख, आरीफ शेख, शोएब शेख, अयाज शेख, रिजवान अली, इम्रान अली, आसीफ शेख, तौसीफ पिंजारी, फैसल खान, रिजवान शेख, शनिपेठ पोलीस ठाण्याचे गिरीश पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सामजिक एकोपा जपणाऱ्या दोघांचा सन्मान
जळगाव शहरातील काट्याफैल परिसरात असलेल्या नूर मशिदीत ओम वॉटर सप्लायर्सचे विलास गायके हे गेल्या ५ वर्षापासून अत्यल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करून देत आहेत. जनता लाइट्सचे आरिफ खान हे लायटिंग व्यावसायिक असून गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे वडील मुन्ना भाई आणि आता ते नूर मशिदीवर विद्युत रोषणाई मोफत करीत आहेत. तसेच संकल्प दुर्गोत्सव मंडळासाठी नवरात्रोत्सवात मोफत विद्युत रोषणाई उपलब्ध करून देत सामजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोघांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.