<
जळगाव, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) : शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांची जात वैधता प्रमाणपत्र अभावी गैरसोय होवू नये. यासाठी तसेच कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव मार्फत विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी व तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समितीस्तरावरुन निर्गमित करण्यासाठी अध्यक्ष गुलाबराव खरात व उपायुक्त राकेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 24 ते 27 एप्रिल 2023 या कालावधीत विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती बी. यु. खरे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता १२ वी विज्ञान व व्यावसायिक पाठयक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जळगाव समितीच्या कार्यक्षेत्रातील त्यांचे जातीचे प्रमाणपत्र पडताळणी होवून जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी समितीकडे अर्ज दाखल केलेले आहेत. अशा सर्व जाती दावा प्रकरणामध्ये समितीस्तरावर प्राथमिक छाननी करुन ज्या प्रकरणामध्ये कागदपत्रे/पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेली आहे, अशा प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या जाती दावा प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) द्वारे अथवा लेखी पत्रान्वये त्रुटी असल्याचे कळविण्यात आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम २००० मधील कलम ८ अन्वये जाती दावा सिध्द करण्याची जबाबदारी ही अर्जदार यांची असल्याने जाती दावा पडताळणीकामी तात्काळ समितीकडे आपल्या प्रकरणातील त्रुटी पुर्तता करण्यात यावी. जेणेकरुन सन २०२३-२४ या पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व्यावसायिक पाठयक्रमाकरीता राखीव प्रवर्गातून आरक्षीत जागेवर प्रवेश घेण्यासाठी संबंधित विद्यार्थास प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
या प्रकरणामध्ये विद्यार्थ्यांनी अधिनियम २००० मधील कलम ८ अन्वये जाती दावा सिध्द केला आहे अशा प्रकरणामध्ये त्यांच्या जातीची पडताळणी होवून वैधतेचा निर्णय घेवून जात वैधता प्रमाणपत्र तयार झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी समितीकडून एसएमएस (SMS) द्वारे कळविण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या कालावधीमध्ये स्वतः किंवा वडील, आई तसेच रक्त नात्यातील सख्खा भाऊ/बहीण/काका यांनी त्यांचे स्वतःचे टोकन पावतीसह ओळखपत्र दाखवून कार्यालयीन दिवशी समिती कार्यालयात उपस्थित राहून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असेही श्री. खरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.