<
जळगाव – (प्रतिनिधी) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव मार्फत जिल्हाभर “सामाजिक न्याय पर्व” निमित्ताने शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमांतर्गत मा.सहायक आयुक्त योगेशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जळगाव येथील सिद्धार्थ नगर, हरिविठ्ठल नगर जळगाव येथे मांग-मातंग वस्ती व दलीत वस्तीतील समुदायाला भेट करून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच विविध उद्योजकता प्रशिक्षण संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. समुदायातील लोकांना समाज कल्याण विभाग व अधिनस्त विविध महामंडळाच्या योजनांची परिपत्रके तसेच विविध शासकीय प्रशिक्षण संस्थांचे प्रशिक्षणाचे परिपत्रके देण्यात आली.
सदरील कार्यक्रमाच्या सुरुवातीला; सिद्धार्थ नगर मधील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांकडून माल्यार्पण करण्यात आले. तदनंतर सदरील भेटीचा उद्देश व संकल्पना बार्टीचे प्रकल्प अधिकारी युनुस तडवी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर समाज कल्याण विभागाचे निरीक्षक समीर क्षत्रिय यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली तसेच बार्टी चे समतादूत सविता चिमकर यांनी बार्टी, समाज कल्याण विभाग, विविध महामंडळे व विविध शासकीय प्रशिक्षण बाबतीत सविस्तर माहिती दिली.
सदरील कार्यक्रमास सिद्धार्थ नगर मधील सामाजिक कार्यकर्ते भारत सोनवणे, समाज कल्याण विभागाचे निरीक्षक समीर क्षत्रिय, बार्टी चे जिल्हा प्रकल्प अधिकारी युनुस तडवी, समतादूत सरला गाढे, सविता चिमकर, कल्पना बेलसरे, शिल्पा मालपूरे व वस्तीतील बहुसंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.