<
केरळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी मोबाईल फोन वापरताना कथितरित्या त्यात स्फोट घडला आहे.
या दुर्घटनेत ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील थिरुविल्वमला इथं ही घटना घडली आहे. जखमी अवस्थेत मुलीला हॉस्पिटलला नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी मोबाईल फोन सँपल तपासणीसाठी पाठवले आहेत. आदित्यश्री असं या मुलीचे नाव आहे. ती तिसरीच्या वर्गात शिकत होती. आई वडिलांसाठी ती एकुलती एक मुलगी होती. मोबाईलचा स्फोट झाला तेव्हा मुलगी फोनमध्ये गेम खेळत होती. सोमवारी रात्री १० वाजता ही दुर्घटना घडली.
त्यावेळी घरात केवळ मुलगी आणि आजी होती. आजीने सांगितले की, मुलीच्या खोलीतून मोठा फटका फुटल्याचा आवाज ऐकल्याने आजी धावत गेली. जेव्हा आजीने खोलीत पाहिले तेव्हा आदित्यश्री बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. मोबाईल फोनचे तुकडे शेजारी पडले होते. आदित्यश्रीला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलला उपचारासाठी नेले. परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कुन्नमकुलम एसपी टीएस सिनोज म्हणाले की, प्रारंभिक पोस्टमोर्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या टीमने तपासणी केली. विस्फोटाहून चेहरा आणि शरीरावरील गंभीर जखमांमुळे मुलीचा जीव गेल्याचं पुढे आले आहे. हा मोबाईल रेडमी नोट ५ प्रो असून ज्यात ती गेम खेळत होती. मुलीच्या वडिलांनी ३ वर्षापूर्वी सेकंड हँड मोबाईल खरेदी केला होता. स्फोटामुळे मोबाईल फोनच्या बाहेरील आवरणाचे नुकसान झाले.