नवी दिल्ली- आयुष्यात काही गोष्टी अशा असतात, ज्याबद्दल माहिती नसलेलंच चांगलं असतं. जोपर्यंत आपण सत्यापासून अनभिज्ञ राहतो तोपर्यंत सर्व काही चांगलं असतं, पण सत्य समोर येताच संपूर्ण आयुष्य विखुरलं जातं.असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत झाला, जेव्हा त्याने डीएनए चाचणी केली. पती-पत्नीचं नातं पूर्णपणे विश्वासावर चालतं. पुरावे न बघता एकमेकांच्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर जीवन शांततेत सुरू राहातं, पण त्यात समीकरणं जुळवताच सर्व काही बिघडतं. अशीच एक घटना समोर आली आहे.मिररच्या रिपोर्टनुसार, डीएनए रिपोर्टने एका जोडप्याची 20 वर्षांची ओळख आणि 18 वर्षांचं लग्न उद्ध्वस्त केलं.
ही घटना अतिशय फिल्मी आहे, दोन मुलांचे वडील असलेल्या व्यक्तीने त्यांच्या 18 वर्षाच्या लग्नाचं सर्वात मोठं रहस्य उघड केलं. त्याने सांगितलं की तो त्याच्या पत्नीला 20 वर्षांपासून ओळखतो आणि त्यांच्या लग्नाला 18 वर्षे झाली आहेत. त्यांनी एकत्र व्यवसाय सुरू केला आणि वर्षभरातच त्यांनी लग्न केलं.मोठ्या भांडणानंतर दोघेही काही काळ एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र, हे फार काळ टिकलं नाही आणि ते पुन्हा एकत्र राहू लागले. दरम्यान, पत्नी गरोदर राहिली आणि तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. त्यानंतर त्यांचं नातं कधीच तुटलं नाही.
अलीकडेच, जेव्हा त्या व्यक्तीने डीएनए चाचणी करून घेतली, तेव्हा कळालं की त्याची दोन्ही जुळी मुलं प्रत्यक्षात त्याची नाहीतच. त्यांचा बायलॉजिकल पिता दुसरा कोणीतरी आहे. खरं तर, जेव्हा त्याची पत्नी 2 आठवडे विभक्त झाली होती, तेव्हा तिने दारूच्या नशेत दुस-यासोबत रात्र काढली आणि तोच व्यक्ती तिच्या मुलांचा बाप आहे. आता सत्य समजल्यानंतर या व्यक्तीला मोठा धक्का बसला. तो घर सोडून हॉटेलमध्ये राहत आहे. बायकोला बघायची हिंमत होत नसल्याचं त्याने म्हटलं.