<
जळगाव- नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी पाठांतर करण्याऐवजी त्यांच्यातील कौशल्य विकासाला वाव देण्यात आला आहे.त्यानुसार शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यांकन करायचे आहे, अशी माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी दिली.
अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाच्या वतीने विद्यापीठाशी संलग्नित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता, अभ्यास मंडळांचे अध्यक्ष, अधिसभा सदस्य यांची नवीन शैक्षणिक धोरणावर गुरुवारी, विद्यापीठात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी परीक्षा पद्धतीविषयी प्रा. दलाल यांनी मार्गदर्शन केले. वैदिक काळापासून शिक्षण व मूल्यांकन पद्धतीत बदल होत गेला.
गेल्या काही वर्षांत परीक्षेतील गुण डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले गेले. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनीही पाठांतरावर भर दिला होता. यामुळे त्यांच्यातील कौशल्यविकासाला वाव मिळाला नाही. नवीन शैक्षणिक धोरणात पाठांतराऐवजी कौशल्य विकासावर भर राहणार आहे. बोर्डाच्या परीक्षा सोप्या केल्या जाणार असून, त्या पद्धतीने प्रश्नपत्रिका, मूल्यामापन व मूल्यांकन केले जाणार आहे. उन्हाळी परीक्षा, प्रश्नपत्रिकांचे ऑनलाइन सेटिंग, डिलिव्हरी आणि ऑनस्क्रीन इव्हॅल्युएशन याची माहिती प्रा. दलाल यांनी दिली.
डिजिलॉकर, एबीसीवर नोंदणी आवश्यक:- प्रत्येक विद्यार्थ्याने डिजिलॉकर व एबीसी (अकादमिक बँक ऑफ क्रेडिट) या ठिकाणी नोंदणी करणे सक्तीचे आहे. विद्यापीठाच्या १ लाख २६ हजार विद्यार्थ्यांपैकी १ लाख २२ हजार जणांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. शैक्षणिक सत्र २०२३-२४ सुरू करतानाच नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन महाविद्यालयांना करण्यात आले. या सुविधेमुळे एका विद्यापीठाचे क्रेडिट दुसऱ्या विद्यापीठातील पदवीसाठी वापरता येणार आहेत. याला बोर्ड ऑफ स्टडीज् मान्यता देईल.
इतर कॉलेजमध्येही शिकू शकता:- नवीन धोरणात विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. अभ्यासक्रमात मेजर आणि मायनर विभाग करण्यात येतील. मायनर विभागात विद्यार्थ्यांना आपल्या शाखेच्या व्यतिरिक्त आवड असलेला विषय शिकता येईल. तो विद्यार्थी इतर महाविद्यालयातूनही आवडीचा विषय शिकू शकेल, अशी माहिती सत्रात देण्यात आली.