<
पुणे- जुन्या तिकीटांच्या मशीनमध्ये सतत बिघाड तसेच बॅटरी डाऊन होणे अशा समस्यांना वाहकांना सतत सामोरे जावे लागत असे. मात्र आता ही कटकट संपणार असून, एसटी महामंडळाने देखील स्मार्ट बनण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या जून महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यभरातील सर्व विभाग तसेच आगारातील वाहकांना अँड्रॉईड तिकीट मशिन दिले जाणार आहे.
पुर्वी प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वाहकाला गळ्यात तिकीटांचा जड ट्रे घेऊन फिरावे लागत होते. त्यानंतर डिजिटल स्वरूपात तिकीट देता यावे, यासाठी एसटी महामंडळाकडून प्रत्येक वाहकाला डिजीटल तिकीट मशीन देण्यात आल्या. पण अनेक मशीन बंद असल्याने वाहकांना जुन्या पद्धतीने तिकीट द्यावे लागत होते.
महाराष्ट्रासह पुणे विभागात तब्बल 50 टक्के मशिन नादुरुस्त असल्याचे एस.टी. महामंडळाकडून सांगितले जाते. त्यानुसार ज्या ज्या विभागातील मशीनची लाईफ संपली आहे. त्या त्या विभागात पुर्वीच अँड्रॉईड तिकीट मशीन दिले होते. आता संपूर्ण महाराष्ट्रातील आगारातील वाहकांना हे अॅन्ट्रॉईड तिकीट मशीन देण्यात येणार आहे.