<
जळगांव- राज्यातील सरकार सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरीता 15 एप्रिल ते 15 जून, 2023 दरम्यान शासकीय योजनांची जत्रा हा अभिनव उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील 75 हजार पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केले.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारंभ येथील पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ प्रवीण आशिया, पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, नागरिक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.