<
राज्यातील तीस हजार शिक्षकांची भरती करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. तर जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत शिक्षकांच्या नेमक्या जागा समजणार नाहीत आणि भरती करता येणार नाही, अशी माहिती राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरपर्यंत ही भरती होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.
राज्यातल्या शिक्षण सेवकांच्या मानधनामध्ये राज्य सरकारने नुकतीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढ केली आहे. त्यानंतर राज्यातील हजारो शिक्षकांची पदे रिक्त असल्याबाबत ही पदे भरावी यासाठी सातत्याने मागणी होत असताना राज्य सरकारने सुमारे 30 हजार पदांची भरती करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत उमेदवार:– राज्यातील डीएड झालेले अनेक विद्यार्थी हे टीईटी परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही परीक्षा न झाल्यामुळे हे विद्यार्थी शिक्षक म्हणून होणाऱ्या भरतीसाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे सरकारने त्वरित शिक्षक पात्र परीक्षा घ्यावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. यासंदर्भात राज्याचे शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देवल यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही टेट ही परीक्षा घेतली आहे. टेट परीक्षेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत असून गरजेप्रमाणे या विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल. तसेच टीईटी परीक्षेच्या संदर्भातही आम्ही सकारात्मक असून लवकरच ती परीक्षा सुद्धा घेतली जाईल असे देवल यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन:– दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या यावर शिक्षकांची संख्या अवलंबून असते. जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या प्रमाणात शिक्षक भरती केली जाते किंवा एखाद्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल तर त्या शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये वर्ग केले जातात. यासाठी राज्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन करून नेमकी विद्यार्थी संख्या किती आहे, याचा आढावा घेतला जात आहे. राज्यात एकूण दोन कोटी तेरा लाख विद्यार्थी आहेत. यापैकी दीड कोटी विद्यार्थ्यांची आधार तपासणी झाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांची आधार तपासणी लवकरच पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.
संच मान्यतेच्या प्रतीक्षेत:– एकदा ही सर्व संख्या हाती आल्यानंतर त्यानुसार शिक्षक भरती लगेच करण्यात येईल, त्यासाठी संच मान्यता घेण्यात येईल. एक सप्टेंबरला या सर्व गोष्टींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार संच मान्यता घेऊन पुढील कार्यवाही केली जाते. त्याचप्रमाणे आताही संच मान्यता मिळाल्यानंतर शिक्षक भरती केली जाईल असेही देवल यांनी सांगितले