मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून ‘स्वच्छ सुंदर एसटी’ बस स्थानक नावाचा नवा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे. तो अजून प्रभावी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी, विनोदवीर ‘मकरंद अनासपूरे’ यांची एसटी महामंडळाचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत.यावेळी मकरंद अनासपुरे यांनी आपल्याला मिळालेल्या नव्या जबाबदारीविषयी मोठा आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ‘एसटीच्या अनेक योजना आहेत. त्या मला माहिती आहेत. या अगोदर देखील अनेकवेळा शुटींगच्या दरम्यान मी एसटीमधून प्रवास केला आहे. यामुळे या नव्या जबाबदारीची भूमिका पार पाडत असताना मला त्याचा उपयोग होणार आहे.
एसटी प्रवास हा कधीही न विसरता येणारा प्रवास आहे. हे मला आवर्जून सांगायला आवडणार आहे. लालपरीच्या अशा कितीतरी आठवणी आहेत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जी घोषणा करण्यात आली आहे, ती खरच खूप समाधानकारक आणि आनंदी आहे. एसटीसाठी मला जे काही करता येईल त्याच्यावर मी भर देणार आहे’. अशी भावना मकरंद यांनी व्यक्त केली आहे.