जळगाव दि.2 – एकविसावे शतक हे अत्यंत धकाधकीचे आणि धावपळीचे आहे. अशा या धावत्या युगात आपण आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आणि त्यासाठीच आपण आपल्या आहारात सर्व पोषक तत्वांचा अंतर्भाव करणे महत्वाचे ठरेल असे प्रतिपादन या चर्चासत्रासाठी जमलेल्या तज्ञांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव प्रायोजित खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आणि धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण व आरोग्यदायी जीवनशैली या विषयावर नुकतेच राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रामध्ये देशभरातून शंभर संशोधक विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते. याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. साहेबराव भुकन हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. आर. चौधरी यांनी केले. डॉ. निलेश जोशी यांनी सूत्रसंचालन तर डॉ. केतन चौधरी यांनी आभार मानले.
यावेळी डॉ. अनिकेत अंबेकर (वर्धा) यांनी मुख्य व सूक्ष्म पोषक तत्वे, प्रा. संजय हिरोडे (अमरावती) यांनी निरोगी जीवनशैली, प्रा. राजेंद्र शेळके (मुंबई) यांनी आहार व आरोग्य, डॉ. गोविंद मारतळे (फैजपूर) यांनी समतोल आहार व जीवनशैली, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (जळगाव) यांनी क्रीडा पोषण या विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अशोक राणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात वाढत्या वयोमानानुसार बदलत जाणारी जीवनशैली आणि आपण घेत असलेला आहार या विषयावर प्रकाश टाकला. या चर्चासत्रात अकरा संशोधक विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले व या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. संजय चौधरी, प्रा. संजय हिरोडे व प्रा. राजेंद्र शेळके यांनी भूषविले.
सूक्ष्म पोषकांकडे सुद्धा लक्ष द्या: डॉ. अनिकेत आंबेकर
सर्वसामान्यपणे आपण जेव्हा आपल्या आहाराचा विचार करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त वेळा मुख्य पोषक घटकांवर लक्ष केंद्रित करत असतो. मात्र यांच्यासोबतच जीवनसत्वे आणि खनिजे ही सूक्ष्म पोषके देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात.
निरोगी व्यक्ती, निरोगी समाज: प्रा. संजय हिरोडे
व्यक्ती हा समाजाचा एक अविभाज्य घटक आहे आणि सध्याची आजूबाजूची परिस्थिती बघता निरोगी समाजाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला पटेल. निरोगी समाज जर घडवायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने आपले आरोग्य चांगले राखणे अत्यंत गरजेचे आहे.
सुयोग्य आहार हेच आरोग्याचे गमक: प्रा. राजेंद्र शेळके
आपल्याला जर आपले जीवन आनंददायी जगायचे असेल तर आपण आपले सर आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे असते. आणि हेच आरोग्य चांगले राखण्यासाठी सुयोग्य व समतोल असा आहार हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.
जीवनशैलीला अध्यात्माची जोड द्या: डॉ. गोविंद मारतळे
आपण घेत असलेला आहार हा केवळ आपल्या शरीरावरच नाही तर मनावर देखील प्रभाव टाकत असतो. त्यामुळे आपल्या जीवनशैलीला आरोग्यदायी राखण्यासाठी अध्यात्माची जोड देणे अत्यंत फायद्याचे ठरते, असे प्रतिपादन डॉ. गोविंद मारतळे यांनी केले.
आहाराचे नियोजन खेळाडूंसाठी महत्त्वाचे: डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर
चॅम्पियन होण्यासाठी योग्य वयापासून आहार नियोजन करणे अत्यंत फायद्याचे ठरते. तसेच वाढते वय व त्यानुरूप घेतला जाणारा आहार हि यशाची गुरुकिल्ली आहे. कोणत्याही खेळाडूसाठी त्याचे स्वतःचे शरीर हे सर्वप्रथम असले पाहिजे कारण याच शारीरिक क्षमतांच्या जोरावर तो चॅम्पियन होत असतो.