<
मुंबईहून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका सराफाला रेल्वे प्रवासातील साखरझोप बरीच महागात पडली. गोव्यातील काणकोण येथील क्रॉसिंगजवळ रेल्वे थांबली असता, अज्ञात चोरट्यांने त्यांची सोने असलेली बॅग पळविली.बॅगेत चार कोटी पंचवीस लाखांचे सुवर्णलंकार होते.
अशोक आर असे या सरफाचे नाव असून, तो मूळ केरळ राज्यातील असून, मुंबईतील पनवेल भागात तो रहात आहे.काणकोण येथील क्रॉसिंगवर रेल्वे थांबलेली असता पहाटे सुमारे तीनच्या दरम्यान चोरीची वरील घटना घडली. गुजरातहून केरळला जाणाऱ्या गांधीधाम हमसफर एक्स्प्रेसमधून अशोक आर प्रवास करीत होते. सोने असलेली बॅग खाली लॉक करून ते वरच्या बर्थवर झोपले होते.
पहाटे रूळ बदलण्यासाठी रेल्वे कानकोण क्रॉसिंगवर थांबली असता चोरट्याने बॅगला लावलेली साखळी कापून नंतर बॅग पळवली.ज्या जागेवर रेल्वे थांबली होती, तेथून काही अंतरावर फोडलेल्या अवस्थेत ती बॅग सापडली. खालच्या बर्थवर झोपलेल्या एका प्रवासाला कुणीतरी बॅग घेऊन जात असताना नजरेस पडला. त्याने नंतर अशोकला उठवले. बॅगची त्यांनी शोधाशोध घेतली.
मात्र, ती सापडली नाही. कानकोण येथे पाेहोचल्यानंतर अशोक आर यांनी या चाेरीप्रकरणी तेथील रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. या चोरी प्रकरणाचा तपास चालू असल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे उपअधिक्षक गुरुदास कदम यांनी दिली.