लष्कराच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या अर्थात ‘डीआरडीओ’तील शास्त्रज्ञाला हनी ट्रपमध्ये अडकवून पाकिस्तानी हस्तकांनी गोपनीय माहिती मिळवली आहे. संबंधित शास्त्रज्ञाने हिंदुस्थानशी गद्दारी करीत पदाचा गैरवापर केला आहे.व्हॉट्सअॅप व्हॉईस मेसेज, व्हिडीओ कॉल करून त्याने पाकिस्तानी हस्तकांना संवेदनशील माहिती पुरवली. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने शास्त्रज्ञाला अटक केली आहे.
प्रदीप कुरुलकर असे अटक करण्यात आलेल्या डीआरडीओ शास्त्रज्ञाचे नाव आहे. दहशतवादविरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील डीआरडीओ संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या प्रदीप कुरुलकर याला काही दिवसांपूर्वी फेसबुकवर महिलेचा फोटो असलेल्या आयडीवरून मेसेज आला होता.
त्यानंतर त्याने संबंधित महिलेचा डीपी असलेल्या व्यक्तीसोबत चॅटिंग सुरू केली. काही दिवस मेसेजची देवाणघेवाण झाल्यानंतर कुरुलकरने व्हॉट्सअॅप कॉलिंगद्वारे संपर्क सुरू केला. डीआरडीओचे शास्त्रज्ञ असतानाही पदाचा गैरवापर करीत त्याने गोपनीय माहिती पाकिस्तानी हस्तकाला पाठवली.