<
जळगांव- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मंगळवारी (2 मे) दुपारी दोन महिलांची प्रसूती झाली. एकीला मुलगा आणि दुसरीला मुलगी झाली; पण नवजात शिशू पालकांकडे सोपविताना निरोप देण्यात झालेल्या गोंधळामुळे त्यांची अदलाबदल झाली.
प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि परिचारिका यांच्या हातून ही चूक झाली. डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या चुकीमुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकारात मुलगा माझाचं असा दोन्ही मातांचा दावा आहे.
सध्या बाळ कुणाकडे:- पालक, रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांच्यातील सुरु असलेल्या या गदारोळात मुलांना मात्र आपल्या आईपासून लांब राहण्याची वेळ आली आहे. या मुलांचा सांभाळ सध्या प्रशासन करतंय. या दोन्ही नवजात बाळांना इन्क्युबेटर सेंटरमध्ये ठेवलंय. त्यांचा सांभाळ रुग्णालय प्रशासन करतंय. बाळांचा डीएनए रिपोर्ट समोर आल्यानंतर या बाळांना आपल्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.
निर्णय होणार डीएनए चाचणीने:- परिचारिकांच्या झालेल्या चुकीमुळे या प्रकरणात पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच डीएनए चाचणीनंतर बालके मातेच्या स्वाधीन होणार आहेत.
अजून करावी लागणार प्रतिक्षा:- जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डीएनए किट्स उपलब्ध नाही. यामुळे अदलाबदली झालेल्या बालकांना त्यांच्या आईच्या कुशीत जाण्यासाठी अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही दोन्ही बालके रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षामध्ये ठेवण्यात आलीय. डीएनए किट उपलब्ध नसल्याने गेले चार दिवस ही बालके त्यांच्या मातांपासून दूर आहेत. अजून डीएनए किट कधी मिळणार? त्यानंतर चाचणी होऊन कधी निर्णय होणार? या प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळत नाही.