पुणे- बांधकाम व्यावसायिक आणि कुटुंबीय बाहेर जेवण्यासाठी गेल्यानंतर सुरक्षारक्षकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सेनापती बापट रोडवरील बंगला फोडत साडेदहा लाखांच्या रोख रकमेसह तब्बल 79 लाखांचा ऐवज चोरी करून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सुरक्षारक्षक झंकार बहादूर (रा. नेपाळ) आणि त्याच्या दोन साथीदारांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रीतम राजेंद्र मंडलेचा (रा. राजविला बंगलो, मंगलवाडी सोसायटी, सेनापती बापट रोड) यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी प्रीतम मंडलेचा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा सेनापती बापट रोड परिसरात राजविला नावाचा प्रशस्त बंगला आहे. झंकार बहादूरच्या जागेवर यापूर्वी काम करणारा सुरक्षारक्षक सुटीवर गेल्याने झंकार सौद याच्या सुरक्षारक्षक एजन्सीने सौदला बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून नेमले होते.
गेल्या दोन महिन्यांपासून तो बंगल्याचा रक्षक म्हणून काम करीत होता. शनिवारी मंडलेचा आणि त्यांचे कुटुंबीय जेवणासाठी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान बाहेर पडले. याच संधीचा फायदा घेत सौदने त्याच्या अन्य दोन साथीदारांना बंगल्यावर बोलावून घेतले. त्यांनी बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाचे लॅच तोडून बंगल्यात प्रवेश केला.