देशातील नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत (एनईपी) उच्च शिक्षणांमध्ये सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी यूजीसी देशभरातील 300 विद्यार्थ्यांना आपला ब्रँड ॲम्बेसेडर बनवणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही मोठी खुशखबर असणार आहे. या विद्यार्थ्यांना एनईपी-सारथी म्हटले जाणार असल्याची माहीती आहे.
यूजीसीचे चेअरमन प्रा. एम जगदेशकुमार यांनी माहीती दिली की, आयाेगाने एनईपीच्या तरतूदी लागू करण्यात विद्यापीठांची सक्रिय भूमिका वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आयोगाने सर्व विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्था व काॅलेज प्राचार्य, संचालकांकडे तीन-तीन नावे पाठवण्यास सांगितले आहे.एनईपी-सारथी एनईपीअंतर्गत उच्च शिक्षण क्षेत्रात केल्या जाणाऱ्या पुढाकाराप्रति जागरूक, माहितींचा प्रसार, अन्य विद्यार्थ्यांना या धोरणातून कोणता फायदा मिळेल, हे समजून सांगितले जाणार आहे.
उच्च शैक्षणिक संस्थेत कोणत्याही पातळीवरील विद्यार्थ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. या विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य असणे आवश्यक आहे. संस्था एनईपी-सारथीसाठी प्रस्ताव जूनच्या अखेरपर्यंत पाठवू शकेल. जुलैमध्ये 300 एनईपी-सारथीच्या नावांची घोषणा होणार आहे.