<
राज्यातील नागरिक पारंपरिक पद्धती व्यतिरिक्त ईमेल, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच इतर समाज माध्यमातून शासनाकडे सूचना, तक्रारी, निवेदने पाठवित असतात. त्यावर कार्यवाही होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आपले सरकार आणि मुख्यमंत्री सचिवालय अशी संयुक्त यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
नागरिकांनी पाठविलेल्या तक्रारींबाबत पाठपुरावा तसेच नागरिकांना याविषयी माहिती मिळत राहणे गरजेचे आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग हा आपले सरकार टीमच्या मदतीने ही यंत्रणा उभारत असून ती लवकर कार्यान्वित करावी जेणेकरून नागरिकांना त्याचा उपयोग होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.दरम्यान भारतनेट चे जाळे राज्यभर पसरविण्याचे काम 26 जिल्ह्यांत मिळून 77 टक्के झाले असून 2751 ग्रामपंचायतीमध्ये कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बीएसएनएल कार्यवाही करत आहे.
याशिवाय मुख्यमंत्री डॅश बोर्ड, मुख्यमंत्री हेल्पलाईनविषयी माहिती देण्यात आली. हेल्पलाईनमध्ये चॅटबॉट तसेच व्हॉटसॲपचा अंतर्भाव करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्र्यांना काही महत्वाचा संदेश नागरिकांना द्यायचा असल्यास त्याचीही सोय असणार आहे.