<
भारतात बनविल्या गेलेल्या कफ सिरपच्या गुणवत्तेबाबत जगभरात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. भारतात तयार करून पाठविण्यात येणाऱ्या कफ सिरपबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत महत्वाचे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारने हे औषध परदेशात पाठवण्यापूर्वी त्याची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कफ सिरप निर्यात करणाऱ्या कंपन्यांना त्यांची उत्पादने परदेशात पाठवण्यापूर्वी नियुक्त सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करून घेणे बंधनकारक असणार आहे.
प्राप्त माहीतीनुसार, परदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एक अधिसूचना जारी केली असून त्यातील उल्लेखानुसार उत्पादनाच्या नमुन्याची प्रथम प्रयोगशाळेत चाचणी करावी लागणार आहे. त्यानंतरच कफ सिरप निर्यात करण्यास कंपन्यांना परवानगी दिली जाणार आहे. तसेच कंपन्यांना चाचणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली जाईल. हा नवीन नियम 1 जूनपासून लागू होणार असल्याचंही सांगितलं गेलं आहे.