<
पुण्यात रोजगाराच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. येत्या पाच वर्षात पुण्यात हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.कर्जसुविधा देण्याबरोबरच वित्तीय व्यवहारासाठी देशात आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या ‘बजाज फिनसर्व्ह’ कंपनीने पुण्यात ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
‘बजाज फिनसर्व्ह’ कंपनीने राज्य सरकारशी करार केला असून मुंढवा येथे १९ एकर जागेत कंपनीच्या मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवाप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे.
यासंदर्भात राज्य सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यामध्ये शनिवारी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. श्रीनिवासन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज उपस्थित होते.