<
मुंबई- भारतीय बालकल्याण परिषद (इंडियन कौन्सिल फॉर चॉइल्ड वेल्फेअर अर्थात आयसीसीडब्ल्यू) नवी दिल्लीतर्फे दरवर्षी मुलांनी बजावलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात येतात. २०२३ च्या पुरस्कारांसाठी १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे गेल्या ६६ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी विविध स्त्रोतांकडून शिफारशी प्राप्त होतात.
मात्र, ज्या बालकांच्या शौर्याची नोंद घेण्यात आलेली नाही, अशा मुलांचे धाडस आणि पराक्रमाचे कौतुक व्हावे म्हणून अर्ज मागविण्यात आले आहेत. सन २०२३ च्या पुरस्कारांची अधिक माहिती आणि नामांकन अर्जासाठी www.iccw.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.जीवाला धोका किंवा शारीरिक दुखापत होण्याचा धोका असताना असामाजिक तत्व, गुन्हेगारांविरुद्ध धाडसाने कृती करणाऱ्या बालकांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणार आहे.
त्यांच्यापासून अन्य बालकांना नि:स्वार्थ सेवेची प्रेरणा मिळावी, म्हणून हे पुरस्कार देण्यात येतात. अर्जदाराने अर्जासमवेत त्याने बजावलेल्या शौर्याची माहिती देणारे वर्णन २५० शब्दांत द्यावयाचे आहे. त्याच्या पुराव्यासाठी वृत्तपत्रीय कात्रण, प्रथम माहिती अहवालाची (एफआयआर) प्रत, घटनेविषयी दोन सक्षम अधिकाऱ्यांनी साक्षांकित केलेली कागदपत्रे जोडावीत.
बालकाचे वय ६ ते १८ वर्षांदरम्यान असावे. बालक ज्या शाळेत शिक्षण घेत आहे, त्या शाळेचे मुख्याध्यापक, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य बालकल्याण परिषदेचे सरचिटणीस, जिल्हाधिकारी किंवा समपदस्थ अधिकारी, पोलिस अधिकारी यापैकी दोन जणांची शिफारस जोडणे आवश्यक आहे. १ जुलै २०२२ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत घटना घडलेली असावी.राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची निवड भारतीय बालकल्याण समितीतर्फे गठित उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून करण्यात येते.
अर्ज सादर केला म्हणजे निवड होईलच, असे नाही. कोणत्याही कारणास्तव नाकारलेले अर्ज पुन्हा विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्कारासाठी आलेला अर्ज निवड समितीला योग्य वाटला, तर ते आपल्या विवेक बुद्धीनुसार अटी, नियम शिथिल करण्याचा विचार करू शकतात. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. सुवर्ण, रौप्य पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप राहील.
पुरस्कारांची सविस्तर माहिती अशी (कंसात पुरस्काराची रक्कम) : भारतीय बालकल्याण परिषद भारत पुरस्कार (१ लाख रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद ध्रुव पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद मार्केंडेय पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद श्रावण पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद प्रल्हाद पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद एकलव्य पुरस्कार (७५ हजार रुपये), भारतीय बाल कल्याण परिषद अभिमन्यू पुरस्कार (७५ हजार रुपये), सर्वसाधारण पुरस्कार (४० हजार रुपये). एकूण २५ पुरस्कार देण्यात येतील.राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांना त्यांचे शालेय शिक्षण होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. तसेच पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्थसाहाय्य केले जाते.
अर्जाची प्रत राज्याच्या बालकल्याण समितीकडे पाठविणे आवश्यक आहे. त्याचा पत्ता असा : सचिव, महाराष्ट्र राज्य बालकल्याण परिषद, बाल भवन, चौधरी संकुल नाशिक- पुणे महामार्ग, पळसे, ता. जि. नाशिक” ४२२२१०१ (महाराष्ट्र), ई- मेल आयडी : [email protected], [email protected] येथे पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.