<
जळगाव – (प्रतिनिधी) – समाज चिंतामणी प्रतिष्ठानतर्फे पूज्य साने गुरुजी यांच्या ७३ व्या स्मृतिदिनानिमित्त काव्यरत्नावली चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला साने गुरुजी यांच्या स्मृतिस्थळाला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्पार्पण करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण हे होते. त्यांनी साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर येथील विविध आठवणींना उजाळा दिला. साने गुरुजींमुळे जळगाव जिल्ह्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक प्राप्त झाला असेही त्यांनी सांगितले.ज्येष्ठकवी प्रा. प्रकाश महाजन यांनी सांगितले की साने गुरूजी हे मातृहृदयी होते.
प्रेम हाच खरा धर्म असल्याचा संदेश गुरुजींनी जगाला दिला.ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे मानसपूत्र,लेखक डी.बी.महाजन याप्रसंगी म्हणाले की, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषण केले.एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला मुक्त केले.ज्येष्ठकवी अशोक पारधे यांनी साने गुरुजींच्या जीवनावर ”करुणेचा सागर : साने गुरूजी” ही सुरेख स्वरचित कविता सादर केली. समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.यावेळी तबला वादक उमेश सूर्यवंशी, ज्योती नारखेडे, गीता चौधरी, संगीता गवळी, वर्षा गवळी आदि मान्यवर उपस्थित होते.”खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” साने गुरुजींच्या या प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.