<
जिल्हा न्यायालयात आजी-माजी पालकमंत्र्यांचा प्रचारात केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपाबद्दल दाव्याची सुनावणी सुरू आहे; परंतु सलग दुसऱ्या दिवशी गैरहजर राहण्यावरून खटला चर्चेत आला आहे.सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्या प्रकरणी मंगळवारी जळगाव न्यायालयाने मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना 500 रुपयाचा दंड ठोठावला होता. त्यानंतर बुधवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे देखील सुनावणी दरम्यान गैरहजर राहिल्याने त्यांनाही न्यायालयाने पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे.
नेमकं प्रकरण काय?
विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांनी 2016 एकनाथ खडसे मंत्री असताना त्यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात कोणतेही तथ्य नसताना आपल्यावर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे आपली समाजात प्रतिमा मलिन झाली, बदनामी झाली असल्याचं सांगत एकनाथ खडसे यांनी जळगाव न्यायालयात गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, मंगळवारी मंत्री गुलाबराव पाटील हे न्यालयात हजर राहू न शकल्यामुळे त्यांना दिवाणी सत्र न्यायालय वरिष्ठ स्तर न्या. नायगावकर यांनी खर्चापोटी ५०० रुपये भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दावा करणारे खडसे देखील बुधवारी गैरहजर राहिल्याने ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे न्यायालयाचा निर्णय राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
मात्र वैद्यकीय कारणास्तव खडसे हे बुधवारी सुनावणी दरम्यान न्यायालयात हजर न राहता वकिलाच्या मार्फत त्यांनी पुढील तारीख मिळण्यासाठी कोर्टाकडे विनंती अर्ज केला. या अर्जाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वकिलांनी ही कोणतीही हरकत घेतली नाही. न्यायालयानेही अर्ज मंजूर करत पुढील सुनावणीची तारीख 27 जून ठेवलीआहे