<
जळगाव दि. ०१ प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूल मध्ये नेहमीच आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यांची सांगड घातली जाते. जेणे करून विद्यार्थ्यांना योग्य वयात योग्य ते शिक्षण घेता यावे. काळाच्या पुढे जाऊन अनुभूती निवासी स्कूलमध्ये सुरवातीपासूनच विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग, गणित या विषयाला धरून (STEM Lab) कार्यान्वित आहे. अनुभूती इनोव्हेशन सेंटर मध्ये आता आर्टिफिशीयल इंटेलिजन्स आणि रोबोटिक लॅबची भर पडली आहे. इयत्ता ५ वी पासून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण मिळत आहे. पारंपरिक शिक्षणासोबत आधुनिक सांकेतिक दुनियेत विद्यार्थी सक्षम होऊ पाहत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व औद्योगिक कौशल्ये विकसीत केली जावीत म्हणुन सीआयएससीई, दिल्ली बोर्डाने या वर्षापासून अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) विषयाचा समावेश केला आहे. अनुभूती स्कूलमध्ये विद्यार्थी इयत्ता ९ वी पासून हा विषय अभ्यासत आहेत. तसेच इयत्ता ५ वी ते ८ वी चे विद्यार्थीसुद्धा आर्टिफ़िशियल इन्टेलिजन्स क्लब मध्ये प्रात्याक्षिकासह अनुभव घेत आहेत. जेणे करून याविषयाचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल. त्याकरिता अनुभूती निवासी स्कूल व्यवस्थापनाने स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून अत्यंत अनुभवी शिक्षकांची नेमणूकसुद्धा केली आहे. या अभ्यासक्रमात विद्यार्थी रोबोटिक्स, कोडिंग, थ्री डी प्रिंटींग, ड्रोन्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी अशा विषयांचा सखोल अभ्यास करू शकतील. त्यासाठी लागणाऱ्या अद्ययावत संसाधनांची पुर्ततासुद्धा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकासासाठी, अनुभवाधारित शिक्षणासाठी अनुभूती निवासी स्कूल कायम कटिबद्ध आहे. एवढ्या विस्तृत श्रृखंलेत विविध विषयांचे ज्ञान देणारी अनुभूती स्कूल अजून तरी अशा प्रकारची एकमेव स्कूल असल्याचे प्रतिपादन संचालिका सौ. निशा जैन यांनी केले.