<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध विषयांच्या अभ्यास मंडळांची नुकतीच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांनी घोषणा केली. त्यामध्ये समाजकार्य अभ्यास मंडळावर जळगाव शहरातील समाजकार्य क्षेत्रात योगदान देणारे श्री. विरेश पाटील, जळगाव जनता सहकारी बँक मधील व्यवस्थापक सौ. प्रियंका झोपे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित जालना समाजकार्य महाविद्यालय, रामनगर, जालना येथील प्रा. डॉ. बालाजी मुंडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.
समाजकार्य अभ्यास मंडळावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांचे नुकतेच नामनिर्देशन करण्यात आले होते मात्र समाजकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रत्यक्षरित्या कार्यरत असलेल्या आणि समाजकार्य विषयाशी संबंधित असलेल्या विविध तज्ञांची समाजकार्य विषयातील अभ्यासक्रमात योगदान देण्यासाठी नामनिर्देशन व्हावे या हेतूने अभ्यास मंडळाच्या पहिल्या सभेतील ठरावानुसार मा. कुलगुरू यांनी नामनिर्देशन केलेले आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच जालना समाजकार्य महाविद्यालय जालना येथील प्राध्यापक डॉ.बालाजी मुंडे यांचे इतर विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापक म्हणून नामनिर्देशन करण्यात आले. प्रा. डॉ. बालाजी मुंडे हे गेल्या पंधरा वर्षापासून समाजकार्य चे अध्यापन आणि संशोधन करीत आहेत. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले असून ते समाजकार्य विषयातील पीएच.डी. मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची व्याख्याने होत असतात. प्राध्यापक बालाजी मुंडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. समाजकार्य शिक्षणाचा आत्मा असलेल्या क्षेत्र कार्यावर आधारित त्यांचे पुस्तक देखील प्रकाशित झालेले आहे. याशिवाय सामाजिक विकासाच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध समित्यांवर त्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. बाहेरील विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून त्यांचे कार्य आणि अनुभवाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील समाजकार्य अभ्यास मंडळामध्येही उपयोग होण्यास मदत होईल.
अभ्यास मंडळातील दुसरे सदस्य विरेश पाटील हे समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असून त्यांनी व्याख्याता पदासाठी आवश्यक असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट देखील उत्तीर्ण केलेली आहे. याशिवाय मान्यताप्राप्त राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये समाजकार्य विषयातील त्यांचे शोध निबंध प्रकाशित झाले असून ते सद्य: समाजकार्य विषयात पीएच.डी. करीत आहेत. विरेश पाटील हे समाजकार्य विषयातील विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक गतीविधींसाठी सातत्याने जागृत राहून त्याविषयीच्या कृती कार्यक्रमांमध्ये सक्रियरित्या सहभागी होत असतात. याशिवाय त्यांची झेप प्रतिष्ठान या नावाने स्वतःची सामाजिक संस्था असून ते या संस्थेअंतर्गत विविध समाजोपयोगी कार्य करतात. त्यामध्ये प्रामुख्याने युवकांचे संघटन करणे, युवकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करणे, युवकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र चालविणे, युवक युवतींसाठी संगणक साक्षरता कार्यक्रम आयोजित करणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे, रक्तातील प्लाजमा दान शिबिराचे आयोजन करणे याशिवाय सामाजिक कृती म्हणून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे संघटन करून त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय ते राज्य शासनापर्यंत जिल्हाभरातील ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी यशस्वीरित्या आंदोलन केलेले आहे.
समाजकार्य अभ्यास मंडळातील तिसरे नामनिर्देशित सदस्य म्हणून प्रियंका झोपे यांचे देखील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्राचे कुलगुरूंच्या वतीने त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल सलग दुसऱ्यांदा नामनिर्देशन केलेले आहे. प्रियंका झोपे ह्या जळगाव येथील जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड, जळगाव येथे कार्यरत असून महिलांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या बचत गट चळवळीमध्ये त्यांचे अमूल्य असे योगदान आहे.
बचत गट चळवळीमध्ये त्या गेल्या २५ वर्षांपासून सक्रिय असून त्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने ग्रामीण व शहरी भागांमध्ये महिलांचे बचत गट स्थापन करणे, बचत गट चळवळीसाठी प्रोत्साहन देणे, बंद पडलेले किंवा अडचणीत असलेले बचत गट पुन्हा नव्याने सुरू करणे, बचत गटांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, व्यवसाय वृद्धीसाठी व बचत गटांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादी कार्यक्रमांचे त्यांनी यशस्वी आयोजन केलेले आहे. याशिवाय महिला संघटन, महिला साक्षरता, महिलांचा राहणीमानाचा दर्जा उंचावणे यावर देखील प्रियंका झोपे हे सातत्याने काम करीत असतात. समूह संघटन हा त्यांचा आवडता विषय असल्याने व त्यांचे या क्षेत्रातील भरीव योगदानामुळे त्यांचे समाजकार्य अभ्यास मंडळावर नामनिर्देशन करण्यात आले आहे.
प्रा. डॉ. बालाजी मुंडे, श्री विरेश पाटील आणि प्रियंका झोपे या त्रयींनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या शैक्षणिक सामाजिक आणि क्षेत्रकृती कार्यक्रमांचा आणि त्यांच्या अनुभवाचा समाजकार्य अभ्यासक्रम तयार करताना निश्चितपणे लाभ होणार आहे.
सदर नामनिर्देशनाबद्दल त्यांचे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही.एल. माहेश्वरी, प्र.कुलगुरू प्रा. डॉ एस. टी इंगळे, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्रजी नन्नवरे, तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक तज्ञ, समाजकार्यकर्ते तथा समाजातील सर्व स्तरातील व्यक्तिंनी अभिनंदन केले आहे.