<
जळगाव – (प्रतिनिधी) – अवकाश संशोधना संदर्भातील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यासाठी महाराष्ट्र विज्ञान परिषदेद्वारे विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि महाराष्ट्र विज्ञान परिषद यांच्या समन्वयाने आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत ‘चंद्रयान ३’ या विषयासंदर्भात मॉडेल डेमोस्ट्रेशन आणि चर्चा आयोजित करण्यात आली होती. यासाठी महाराष्ट्र विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील , खजिनदार श्री. शशिकांत नेहते , आणि सचिव प्रा. दिलीप भारंबे हे उपस्थित होते.
समाजकार्य शिक्षणातील पदवी आणि पदव्युत्तर विभागातील २० विद्यार्थ्यांनी सदर चर्चेत सहभाग घेतला तसेच पदवी विभागातील क्षेत्रकार्य अभ्यासक्रमांतर्गत १० जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘चंद्रयान’ या मॉडेलची माहिती आणि जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करण्याबाबत सहमती दर्शवली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. उमेश वाणी , सहयोगी प्राध्यापिका डॉ. सुनिता चौधरी यांनी चंद्रयान मॉडेल मराठी विज्ञान परिषदेच्या उपाध्यक्षांच्या हस्ते स्वीकारले महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने आज वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.