<
खंडपीठाचे विभागीय आयुक्तांनाच दिलफरोज शेख यांच्या अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश !
पिंपरखेड, ता. चाळीसगाव :- ग्रामपंचायतीचे सरपंच पद नुकतेच रिक्त झाले होते त्या अनुषंगाने २६ जुलै रोजी पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक पार पडली. ग्रामपंचायतीत सतीश ठुबे गटाचे ५ तर सिद्धार्थ मोरे गटाचे ६ सदस्य आहेत, गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मोरे गटातील सदस्य दिलफरोज यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले होते. त्याअर्थी दोन्ही गटाचे संख्याबळ प्रत्येकी ५-५ असे झाले होते. परंतु, दिलफरोज यांनी विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपील करत जिल्हाधिकारी यांच्या अपात्रतेच्या आदेशास तुर्तास स्थगिती मिळवली. सदर विभागीय आयुक्त यांच्या स्थगिती आदेशाला रद्द ठरवणे किंवा स्थगिती आदेशालाच स्थगिती मिळणेबाबत सतीश ठूबे गटाच्या मुजाहीद शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल करत आव्हान दिले होते.
जिल्हाधिकारी यांनी भूमी अभिलेख विभागाकडून चौकशी न करता अतिक्रमण केल्याचा निष्कर्ष नोंदविणे बेकायदेशीर असून आयुक्तांनी योग्यरीत्या सदर आदेशाला स्थगिती दिली असल्याचा युक्तिवाद दिलफरोज यांच्या वतीने ॲड. भूषण महाजन यांनी न्यायपीठासमोर केला. सदर रीट याचिका २५ जुलै रोजी सुनावणीस येऊन मा. न्यायमूर्ती किशोर संत यांनी सदर याचिका पहिल्याच सुनावणीत निकाली काढली असून दिलफरोज यांच्या शिवाय निवडणूक पार पडली तर दिलफरोज यांना सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल करण्याची संधी डावलली जाईल म्हणून जर आयुक्त यांनी त्यांच्याकडील अपीलात दिलफरोज यांचे विरोधात निकाल दिला तर त्यांनी तात्काळ पद रिक्त करावे अशी अट घातली आहे. तसेच विभागीय आयुक्त, नाशिक यांनी ११ ऑगस्ट रोजी दिलफरोज यांच्या अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यायोगे दिलफरोज यांचे सदस्यत्व, विभागीय आयुक्त यांचे अपिलातील अंतिम आदेश येईपर्यंत अबाधित राखले गेल्यामुळे तसेच सिद्धार्थ मोरे गटाचे संख्याबळ देखील पुन्हा ६ इतके झाल्यामुळे २६ जुलै रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी दिलफरोज यांनीच उमेदवारी अर्ज भरला. प्रतिस्पर्धी गटातील दोन उमेदवारांनी अर्ज ऐनवेळी माघारी घेतल्यामुळे दिलफरोज यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली असून गावातील सिद्धार्थ मोरे गटात जल्लोष पाहायला मिळाला, परंतु दिलफरोज शेख यांचे सरपंच पद हे विभागीय आयुक्तांच्या अपिलावरील अंतिम आदेशाला अधीन असून अपात्रतेची टांगती तलवार त्यांच्यावर कायम आहे. दिलफरोज शेख यांच्या वतीने ॲड. भूषण महाजन यांनी खंडपीठासमोरील कामकाज पाहिले.