<
जळगाव दि. ८ प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६१ वा महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा व १९ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा विभागीय स्तरावर घेण्यात आली. यामध्ये नाशिक विभागातून जळगाव केंद्रावर जानेवारी २०२३ मध्ये ही स्पर्धा झाली. प्राथमिक फेरीत २२ च्यावर बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर झालीत. यात भवरलाल ॲण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव या संस्थेने ‘ढ नावाची आधुनिकता’ हे बालनाट्य सादर केले. ‘ढ नावाची आधुनिकता’ या नाटकासाठी अरविंद बडगुजर यांनी उत्कृष्ट नेपथ्य केले.
नाशिक विभागातून अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ट नेपथ्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. नाशिक येथील परशुराम साईखेडेकर नाट्यगृहात ७ जुलै ला हा सन्मान सोहळा झाला. यावेळी ज्येष्ठ नेपथ्यकर्मी चंद्रकांत जाडकर, जयदीप पवार, विजय साळवी, विभागीय पारितोषिक वितरण समारंभ समन्वय राजेश जाधव, मीना वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते अरविंद बडगुजर यांनी पुरस्कार स्वीकारला. अरविंद बडगुजर यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी कौतूक केले आहे.