<
जळगाव – (प्रतिनिधी) – फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी आर चौधरी दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा मित्रपरिवार, गौरव ग्रंथ प्रकाशन समिती, मधुस्नेह संस्था परिवार आणि कौटुंबिक सदस्य यांचे तर्फे कमल पॅराडाईज च्या हॉलमध्ये भव्य गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजन गौरव ग्रंथ समिती, मित्रपरिवार आणि कौटुंबिक सदस्य आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांचे हस्ते स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. तसेच मधुस्नेह संस्था परिवारातर्फे आमदार शिरीष चौधरी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मधुस्नेह परिवारातर्फे शुभेच्छापत्राचे वाचन प्राध्यापक सागर धनगर यांनी केले. गौरव ग्रंथाचे प्रकाशन उच्च शिक्षण विभाग जळगावचे माजी सहसंचालक आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सतीश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. गौरव ग्रंथाची भूमिका प्राध्यापक बी पी सावखेडकर यांनी विशद केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. के बी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा त्या व्यक्तीचे भविष्य बनते आणि डॉ. पी आर चौधरी यांच्या बाबतीत हे विधान समर्पक ठरते असे माजी त्यांनी सांगितले. तर याप्रसंगी केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी देखील प्राचार्य पीआर चौधरी यांचे बद्दल आपल्या भावना व्यक्त करताना डाॅ.पी.आर.चौधरी मु.जे. महाविद्यालयात असताना त्यांनी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण काम करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवल्याचे सांगितले. प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक पी.आर. चौधरी यांच्याबरोबर संघटनेत काम करीत असतानाच त्यांचा चेहरा त्यांनी हेरला व त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली व ती जबाबदारी डॉक्टर पी आर चौधरी यांनी चोख बजावली असे सांगितले. याबरोबरच प्रा. डॉ. सुनिता चौधरी यांनी देखील पीआर चौधरी यांनी त्यांची धर्मपत्नी म्हणून त्यांना शिक्षणासाठी प्रेरित केले सदैव पुढे जा, असे म्हटले त्यामुळेच आज मी प्राध्यापक आहे व चांगल्या क्षेत्रात काम करते आहे.
कौटुंबिक स्थिती देखील खूप चांगली आहे मुली, जावई उच्च पदावर काम करत आहेत याचं श्रेय सर्व पी.आर. चौधरी सर यांना जाते असे सांगितले.प्रमुख अतिथी आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विविध उदाहरणासह आजच्या शिक्षण व्यवस्थेबद्दलची सद्यस्थिती कथन केली. त्याचबरोबर नवीन शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत आणि हे बदल स्वीकारण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकालाच अंतर्मुख होण्याची गरज असल्याचे सांगितले व त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी सर यांनी केलेल्या कार्याचे कौतुक देखील केले. सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. पी आर चौधरी यांनी आपल्या जीवनाचा यशस्वी प्रवास उलगडून सांगितला. त्यामध्ये त्यांना आई-वडील तसेच मोठे बंधू, बहिण आणि स्वर्गीय मधुकरराव चौधरी कुसुमताई चौधरी आणि शिरीष दादा चौधरी यांची मदत झाल्यामुळे ते शिक्षणाच्या प्रवाहात आले. नंतर मु.जे. महाविद्यालय मध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली असे सांगतानाच प्राध्यापक संघटनेच्या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्व अधिक बहरल्याचे सांगितले. विद्यापीठातील विविध भूषवलेली पदांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता आले व माणसे गोळा करता आली, त्यामुळे ते स्वत: प्रमोदचे पी.आर. आणि पी.आर. चे पी.आर. बापू झाले असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रावेर विधानसभा क्षेत्र चे आमदार शिरीष चौधरी यांनी देखील पी आर चौधरी यांना शुभेच्छा देताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले त्याचबरोबर प्राचार्य डॉ.पी आर चौधरी सारख्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी व एकूणच संपूर्ण प्रक्रियेसाठी महत्त्वाची गरज असल्याचे सांगितले याप्रसंगी कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कलुगुरू एस.टी इंगळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिमत्व हे त्याच्या गुणांनी बहरत असते व प्राचार्य पी आर चौधरी यांच्यामध्ये असलेल्या चौरंगी गुणांमुळेच प्राचार्य डॉ. पी आर चौधरी यांच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर डाॅ.सतीश देशपांडे यांनी देखील आपले मनोगतात प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी यांचे बद्दल गौरवोद्गार काढताना सर्वसामान्य माणसांमधील असामान्य माणूस असा त्यांच्या कार्याचा गौरव केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ अरविंद चौधरी यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, एन मुक्टो संघटनेचे पदाधिकारी, कौटुंबिक सदस्य मधुस्नेह संस्था परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.