<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथे मा.आ.सुरेशदादा जैन यांच्या ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रेरणा वृद्धिंगत होण्यासाठी शहरातील सात शाळांमध्ये बौद्धिक खेळ स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
मा. मंत्री श्री. सुरेशदादा जैन हे गेली अनेक वर्ष राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील हुशार परंतु आर्थिक दृष्ट्या अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसडी-सीड च्या माध्यमातून उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरणासोबत शिक्षण पुरक उपक्रमांचे आयोजन गेल्या पंधरा वर्षांपासून सुरु आहे. एसडी-सीड च्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन व कार्याध्यक्षा मिनाक्षीताई जैन या योजनेच्या यशस्वीतेसाठी नेहमीच तत्पर असतात.
नोव्हेंबर २०२३ या वर्षी आदरणीय सुरेशदादा वयाची ८० वर्ष पूर्ण करीत आहेत. या अनुषंगाने जळगाव शहरातील विविध शाळा व महाविद्यालयातील इयत्ता ८ वी ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये आकलन क्षमता, बौद्धिक क्षमतांसह अनेक जीवनावश्यक कौशल्ये विकसीत व्हावी यासाठी बौद्धिक क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
सदर स्पर्धांचे आयोजन मानवसेवा विद्यालय, वाय.डी.पाटील विद्यालय, जय दुर्गा विद्यालय , भागिरथी आय.टी.आय., महाराणा प्रताप विद्यालय, मातोश्री प्रेमाबाई जैन विद्यालय तसेच जी.एन. चांदसरकर जळगाव या ठिकाणी करण्यात आले होते.
विदयार्थ्यांमध्ये हल्ली कमी होत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा रुजावी यासाठी प्रेरणादायी पुस्तकांचे संच विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात देण्यात आले.
तसेच यापुढील टप्प्यात विजेत्या विदयार्थांनी मिळालेली पुस्तके वाचून त्याचा सारांश इतर विदयार्थ्यांना सांगायचा आहे. यातून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व समजावे , वाचनाची आवड निर्माण व्हावी व सुजाण वाचक निर्माण व्हावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवण्यात आला आहे.
सदर स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, हजरजबाबीपणा, समूह भावना, श्रवण कौशल्यांचा विकास होण्यास नक्की मदत होईल अशा भावना शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी व्यक्त केल्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीने सदर स्पर्धांचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल असे प्रतिपादन गव्हर्निंग बोर्ड सदस्य व उपक्रमाचे प्रमुख श्री.महेश गोरडे यांनी केले आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.