<
जळगाव ;- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२४ ला “छत्रपती शिवाजी महाराजांची लष्करी नीती आणि प्रशासकीय धोरणांची आधुनिक युगातील प्रासंगिकता” या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार असून देशातील मान्यवर तज्ज्ञ, अभ्यासक यामध्ये सहभागी होणार आहेत.
विद्यापीठाच्या कला व मानव्य प्रशाळा अंतर्गत संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग कार्यरत आहे. फेब्रुवारीत होणा-या या चर्चासत्रासाठी आयसीएसएसआर, नवी दिल्ली या संस्थेमार्फत अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे. दि. १६ फेब्रुवारी रोजी भारतीय सांस्कृतिक परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचे बीजभाषण होणार आहे. “छत्रपती शिवाजी महाराज – राष्ट्र बांधणी करणारे सर्वोत्कृष्ठ नेतृत्व” या विषयावर ते मांडणी करतील. दोन दिवसाच्या या राष्ट्रीय चर्चासत्रात निवृत्त मेजर जनरल जी. डी. बक्षी (छत्रपती शिवाजी महाराज – भारतीय लष्करी शक्तीचे पुनरुज्जीवन आणि आधुनिक काळाशी त्यांची समयोचितता”), पुणे येथील डॉ. श्रीकांत परांजपे (छत्रपती शिवाजी महाराज – सर्वोत्कृष्ठ सामरिक विचारवंत), महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री. जयंत उमराणीकर (छत्रपती शिवाजी महाराज – गुप्तहेर खाते आणि सध्याच्या हेर खात्यासाठी धडे), पुणे येथील भारत सरकारच्या ऐतिहासिक संशोधन मंडळाचे सदस्य श्री. विक्रमसिंग बाजी मोहिते (छत्रपती शिवाजी महाराज – दक्षिण दिग्विजय आणि त्यांचे सामरिक महत्व), नाशिक येथील हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सदस्य श्री. प्रकाश पाठक (छत्रपती शिवाजी महाराज – गनिमी कावा युध्द पध्दती आणि आधुनिक युध्द पध्दतीत त्यांचे महत्व), पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रायगड मेमोरियल मंडळाचे संचालक श्री. रघुजी राजे आंग्रे (छत्रपती शिवाजी महाराज – भारतीय नौदलाचे पितामह, शिवकाळातील नौदलाची नीती आणि त्यांचे शत्रुंवर झालेले परिणाम), पुणे येथील महाराष्ट्र शासनाच्या किल्ले रायगड प्राधिकरणाचे सल्लागार श्री. सुधीर थोरात (छत्रपती शिवाजी महाराज – स्वराज्यातील प्रशासन आणि सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठीचे धडे), डेक्कन कॉलेज पुणे येथील पुरातत्व विभागाचे डॉ. सचिन जोशी (शिवकाळातील किल्ले – किल्ल्यांचे भूसामरिक महत्व), किल्ले रायगड संवर्धन आर्किटेक्ट रायगड प्राधिकरणाचे श्री. वरुण भामरे ( शिवकाळातील किल्ले – किल्ल्यांचे लष्करी स्थापत्यशास्त्र आणि त्यांचे जतन) हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती गठीत करण्यात आली असून व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे हे कार्याध्यक्ष, प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. रामचंद्र भावसार हे समन्वयक आणि संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाचे डॉ. तुषार रायसिंग हे सचिव म्हणून काम पहात आहेत. चर्चासत्रात छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणारे संशोधक, अभ्यासक तसेच प्राध्यापक व विद्यार्थी यांना शोधनिबंध सादर करण्यासाठी दि. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत मूदत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी डॉ. तुषार रायसिंग यांच्याशी (८७६६६५५४२४ / ९३७०७५२९८९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.