<
जळगाव दि.5 प्रतिनिधी – कान्हदेशचा सांस्कृतिक मानदंड असलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सव पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी व कार्तिकी गाडगे च्या अभिजात संगितासह पंडीत अनुज मिश्रा यांच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, होस्टिंग ड्युटी, प्रायोजित २२ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची
‘नादातून या नाद निर्मितो…श्रीराम जय राम..’ ही संकल्पना आहे. महोत्सवाची सुरवात शंखनादाने झाली. गुरूवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केले. सुत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी केले. गत वर्षात दिवंगत झालेल्या कलावंताना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
दीपप्रज्वलनावेळी माजी महापौर जयश्री महाजन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.चे सौमीक कुमार, जैन इरिगेशनच्या श्रीमती सुलभा जोशी, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, उपस्थित होते. डाॕ. अर्पणा भट, शरद छापेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलावंताचे स्वागत करण्यात आले.
बालकलाकारांकडून स्वरांची रूजवात…
महोत्सवात ज्ञानेश्वरी व कार्तिकी गाडगे या भगिनींनी शास्त्रीय व उपशात्रीय गायनांनी स्वरांची रूजवात केली.
सुरवात राग श्याम कल्याण मध्ये राम कृष्णा हरी ने झाली. त्यानंतर नारायण रमा रमणा, याद पिया की आये, मुरलीधर शाम सुंदरा, सुरत पिया की, पद्नाम नारायण , राम का गुणगान, अभंग बोलवा विठ्ठल तिर्थ विठ्ठल, विष्णू मय जग, वृदांवन..अशी एकाहून एक सुरेख अभिजात संगिताची मेजवानी ज्ञानेश्वरी ने रसिकांना दिली. बालकलाकारांची संगीत सेवा याची देही याची डोळा जळगावकरांनी अनुभवली. तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर यांनी तर थाळवर अरुण नेवे यांनी साथसंगत दिली.
कथ्थक जुगलबंदीने घातली भुरळ
दुसऱ्या सत्रात पं. अनुज मिश्रा व विनिता कारकी यांची कथकवरील जुगलबंदीने जळगावकर श्रोत्यांना भुरळ घातली. सुरवातीला शिव आणि शक्तीचे वर्णन असलेले शिववंदना सादर केली. रावणरचित शिवतांडव, आनंदतांडव सारखे प्रकार सादर करून शिव शक्तीचा जागर केला. विलंबित त्रितालामध्ये लखनौ घराण्याचे वैशिष्ट्ये त्याची नजाकत त्यांनी थाट, परणजुडी आमद तसेच तबल्या सोबत जुगलबंदी सादर केली. मध्य लयीत तोडे, तुकडे तसेच परन सादर करून मध्य लयीचा समारोप 55 चक्करचा तोडा करून केला. त्यानंतर अभिनय पक्षात स्व. पंडीत बिरजू महाराज रचित सुप्रसिद्ध भजन ‘अनेकाएक रूप’ हे कृष्णभजन वनिता कारकी यांनी सादर केले. बाजीराव मस्तानी चित्रपटातील ‘मोहे रंग दो लाल’ ज्या गीतावर स्व. पं. बिरजू महाराज यांनी कोरोग्राफी केली. त्या गीतावर अनुज मिश्रा यांनी नृत्य प्रस्तुत केले. द्रृत तिन तालात स्व. पं. बिरजू महाराज यांची सुप्रसिद्ध मयूरगत तसेच परमेलू चक्रदार आदी सादर केले. सरतेशेवटी 103 चक्करचा तोडा करून रसिकांना अचंबित केले. श्री ‘रामचंद्र कृपालू भज मन’ ही तुलसीदांची रचना सादर करून समारोप केला.