<
जळगांव जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये महिलांच्या स्वच्छता गृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. जिल्हा परीषद, सर्व तहसील कार्यालय, महसूल, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, भुमी अभिलेख कार्यालये, सर्व दुय्यम निबंधक कार्यालये, जिल्ह्यात आरोग्य विभागाद्वारे आरोग्याची काळजी घेणारे तालुकास्तरावरील वैद्यकीय अधिकारी कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी स्वच्छता गृहांची अवस्था नसल्यासारखी आहे.
ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी अत्यंत दुर्गंधी, ड्रेनेज सिस्टीम बंद असलेली, दारे खिडक्या तुटलेली आहेत. सदर विभागाकडे स्वच्छता गृह सुस्थितीत ठेवण्यासाठी पैसे नाहीत का, खर्च होत असतील तर यातही मलमुत्र खाण्यासाठी भ्रष्टाचार होतो का? सदर शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य जनता कामानिमित्त ये जा करीत असते. यावेळी दुरावस्था असलेल्या स्वच्छता गृहाची अवस्था बघून महिला शिव्याशाप, बददुआ देऊन निघून जातात. माननीय जळगांव जिल्हाधिकारी यांनी सर्व शासकीय कार्यालयातील स्वच्छता गृहांची अवस्थेसंबंधी विविध ठिकाणी भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांना स्वच्छता गृहे अद्ययावत करण्यासाठी आदेश द्यावे. सदर कार्यवाही महाराष्ट्रात जळगांव पॅटर्न म्हणून ओळखला गेला पाहिजे. माननीय जिल्हाधिकारी साहेब आपण महिला दिनानिमित्त महिलांना चांगल्या, स्वच्छ, कार्यरत स्वच्छता गृहांची भेट देऊन महिला दिन साजरा करावा.