<
जळगाव – (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ५७ महाविद्यालयात पूर्णवेळ प्राचार्य नसल्याने त्याचा विदयार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होतांना दिसुन येत आहे.
जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांच्या वतीने पूर्णवेळ प्राचार्य भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे त्याचे कारण म्हणजे प्राचार्य पदासाठी एखादा प्राध्यापक गेल्यावर त्या जागेवर “लीन” प्रक्रियेने नवीन प्राध्यापक भरणे आवश्यक आहे. परंतु लीन प्रक्रिया अत्यंत किचकट व त्रासदायक असल्याचे कारण देत प्राचार्य भरती प्रक्रिया महाविद्यालयांकडून राबवली जात नाही हे वास्तव आहे. महाविद्यालयाची शैक्षणिक, प्रशासकीय गुणवत्ता टीकवणे त्यामुळे कठीण बनते. नविन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी करिता भविष्यात एक मोठे संकट या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच घटकांवर पदरी येणार आहे.
महाविद्यालयातील प्राचार्यांची पदभरती तात्काळ करण्यात यावी व त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी लीन प्रक्रियेतील किचकटपणा व कालापव्यय टाळून सुलभ आणि सोईस्कर पद्धतीने प्रक्रिया लवकर राबविण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स युनियनचे राज्य उपाध्यक्ष ॲड. दिपक सपकाळे यांनी निवेदनाव्दारे केलेली आहे.