<
32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
जळगाव दि.30 (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक भवरलालजी जैन यांचे स्वप्न होते की, जैन इरिगेशन ही कंपनी शाश्वत रहावी आणि या शेती उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत याअनुषंगाने ही कंपनी कार्यरत आहे. पुढील 18 ते 20 महिन्यांमध्ये सुमारे 2 हजार कोटी कर्ज कमी करून प्रतिकुल आर्थिक परिस्थीतीवर मात करण्याचे नियोजन असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी भागधारकांसमोर सांगितले.
जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ची 32 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अशोक जैन बोलताना म्हणाले की, कंपनीचा जगामध्ये अधिकाधिक नावलौकिक व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. ‘जेव्हा निर्णायक दिवस येतात तेव्हा स्वार्थापेक्षा परमार्थाला अधिक महत्त्व द्यायचे असते आणि कुटुंबासह नेहमीच कंपनीला प्राधान्य द्या’ या भवरलालजी जैन यांच्या आदर्शमुल्यांच्या मजबुत पायावर उभी आहे.
यावेळी उपस्थितांशी अनिल जैन यांनी सुसंवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, चिफ फायनान्स ऑफिसर अतुल जैन, संचालक मंडळातील आर. स्वामीनाथन, डॉ. एच. पी. सिंग, राधीका परेरा, संचालक घनश्याम दास, डॉ. डी. आर. मेहता, सचिव अवधूत घोडगावकर, संघपती दलिचंदजी जैन, गिरधारीलाल ओसवाल, जैन फार्मफ्रेश फूड्सचे संचालक अथांग जैन, कार्यकारी संचालक सुनील देशपांडे उपस्थित होते. या सभेत सर्व ठराव मंजूर करण्यात आलेत तर लाभांशाचा ठराव स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येणार आहे.
कंपनीच्या एकूण परिस्थितीबद्दल भूमिका मांडताना अनिल जैन म्हणाले की, गत आर्थिकवर्ष आपल्यासाठी खूप चांगले होते. भारत व भारताबाहेरच्या संलग्न कंपन्यांनी चांगला व्यवसाय केला. चालू आर्थिक वर्षात अनेक आव्हाने आलीत. गेल्या महिन्यांपासून काही प्रकल्पांची रक्कम येणे बाकी आहे, तसेच बँकांच्या बदललेल्या धोरणांमुळे कंपनीला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनीचे प्रयत्न सुरू असुन लवकरच थकीत रकमेची वसुली करून कंपनी पुर्वपदावर येईल असा आशावाद व्यक्त केला. कंपनीच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि सक्षमीकरणासाठी जागतिक व भारताच्या पातळीवर एक वित्तीय साहाय्य करणारी संस्था नियुक्त करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून लवकरच गुंतवणूकदार मिळेल असा विश्वास आहे.
यावेळी संचालकांच्या वतीने ज्येष्ठ संचालक डॉ. डी. आर. मेहता यांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी ‘जैन इरिगेशन कृषीक्षेत्राला अत्याधुनिक तंत्रासह वेगळ्या उंचीवर नेणारी कंपनी असून कंपनीचे भविष्य उज्ज्वल आहे.’ असे त्यांनी सांगितले.
‘भूमिपुत्राने भूमिपुत्रांसाठी या कंपनीची स्थापना केली असल्याने तिची वाटचाल शाश्वत आहे. कंपनी हा अखंड यज्ञ व तपस्या आहे. त्याग आणि समर्पण भावनेने काम करून धेयापासून विचलीत न होता संस्थापक भवरलालजी जैन यांचे ही कंपनी शंभर वर्षांहून अधिक वर्ष कार्यरत राहावी हे स्वप्न होते. आणि या स्वप्नपुर्तिसाठी आम्ही सारे कटिबद्ध आहोत.’
संचालक वसंत वर्टी यांचा सत्कार
गत 14 वर्षापासून कंपनीत कार्यरत असलेले संचालक वसंत वर्टी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, संचालक डी. आर. मेहता यांच्याहस्ते शाल, श्रीफल, गांधी पुतळा देऊन करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर देताना वसंत वर्टी म्हणाले की, एक वेगळी आणि शाश्वत कंपनी म्हणून मी जैन इरिगेशनकडे नेहमीच पाहतो. माझ्या संचालकपदाचा काळ माझ्यासाठी खूप गौरवाचा होता.
बॅकड्रॉपवर प्रेरणादायी विचार
कार्पोरेट क्षेत्रातील घडामोडींमुळे उदासीनतेचे वातावरण सध्या आहे. या वातावरणात भागाधारकांना प्रेरणा देणाऱ्या काव्यपंक्ती ‘काळ्या मेघांनी जेव्हा तुमचे आकाश काळवंटे, कडाडती वीज तुमचे जग दुभंगते, घनगर्जनानी तुमची शांति उध्वस्त होते, लक्षात ठेवा तेव्हाच जलधारांची वृष्टी होते. वृष्टी जी भूमी सुपीक ,हिरवीगार आणि समृद्ध करते ‘ सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.