<
जळगाव दि.५ (प्रतिनिधी) – आगम वाचना मुळे प्रत्येकाच्या जीवनात चांगले परिवर्तन घडेल हे निर्विवाद सत्य आहे. तीन दिवसांच्या आगम वाचना शिबिरात श्रावक-श्राविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी केले. जैन हिल्स येथे आयोजित आगम वाचना शिबिराच्या पहिल्या दिवसाच्या औपचारिक उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. जळगाव येथे होणारे हे सहावे शिबीर असून यात चारशेहून अधिक श्रावक-श्राविका सहभागी झालेले आहेत.
जळगाव येथील आकाश प्रांगण, जैन हिल्स स्थित ‘हिरा संस्कार छत्र’ येथे जैन धर्मियांची मुख्य गाथा ‘आगम वाचना’ या तीन दिवसीय शिबिराचा शुभारंभ सकाळी झाला. सर्वात आधी सेवार्थी चोरडिया-जैन परिवाराच्यावतीने अशोक जैन यांनी ‘ठाणांग सूत्र’ ग्रंथ आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्याकडे सुपुर्त करून अर्पण केला. ते वाचन करण्याची विनंती केली. कार्यक्रम स्थळी या ग्रंथाची स्थापना झाली. भवरलाल आणि कांताबाई जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य सेवादास दलुभाऊ जैन, अशोक जैन, अभंग अजित जैन आणि अजय ललवाणी, स्वरुप लुंकड यांच्याहस्ते मंगलदीप प्रज्ज्वलन करण्यात येऊन याच वेळी आगम पोथीचेही विमोचन करण्यात आले. जैन हिल्स येथील आयोजिलेले हे सहावे आगम वाचना शिबीर आहे. यापूर्वी बडनगर गुजरात (२०१८), शिवपूर, गुजरात (२०१९), इंदूर, मध्यप्रदेश (२०१९), भायखाळा मुंबई महाराष्ट्र (२०२०) आणि आंमली अहमदाबाद-गुजरात (२०२२) असे पाच शिबीरे संपन्न झाले आहेत. जैन हिल्स येथे हे शिबीर आयोजनामागची भूमिका अशोक जैन यांनी आपल्या भाषणातून श्रावक-श्राविकांपुढे मांडली. उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. गायक सुजल शाह यांनी भक्तीगीते सादर केली. कार्यक्रम संपन्नतेसाठी संजय गांधी, देवांग दोशी, किरण जैन, अमित कोठारी आदींनी परिश्रम घेतले.
आगम वाचना प्रवेशात आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेब यांनी ‘ठाणांग सूत्र’ मध्ये सांगितलेल्या १० सुखांबाबत सांगितले. यातील पहिले सुख हे ‘आरोग्य’ आणि दहावे सुख हे ‘मोक्ष’ सांगण्यात आले आहे. तीन दिवसांच्य वाचनात सकाळी ९ ते १२ आणि तद् नंतर गौराई प्रसादालयात सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. दुपारी २.३० ते ४.३० अशा दोन सत्रात वाचन आणि त्याचे निरुपण समजावून सांगण्यात येत आहे.
सकाळ सत्रात आचार्य भगवंत म्हणाले की, ‘आरोग्य’, ‘वेळ’, ‘सम्यक दर्शन’ आणि ‘उपसमभाव’ या विषयी सविस्तर विवेचन केले गेले. ‘संपत्ती’ की ‘आरोग्य’ तुम्ही कुणाला प्राधान्य द्याल? ‘ठाणांग सूत्र’मध्ये आरोग्य या सुखाला पहिले स्थान दिले आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. कुपथ्य व अतिप्रवृत्ती यामुळे आरोग्य बिघडते. तुमचे वडील जे खात नव्हते ते आजची पुढी खाते. त्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. वेळेचे महत्त्व प्रत्येकाने जाणले पाहिजे. वेळेच्या बाबत प्रमाद आणि आळस करत असतो. निंदा करू नये असे आगम मध्ये सांगितले आहे परंतु निंदा करतो त्याला प्रमाण म्हणतात. मंदिरात जाऊन देवाची स्तुती करावी असे सांगण्यात आले आहे परंतु मंदिरात न जाणे, स्तुती न करणे याला आळस म्हटले जाते. भोजन, मोबाईल, टिव्ही बघण्यात आपला अनमोल वेळ आपण व्यर्थ घालवत असतो. मिळालेला मानवजन्म अनमोल आहे वेळेच्या सदुपयोग करायला हवा असे आवाहन देखील करण्यात आले.
आगम वाचना दुपारच्या सत्रात आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी महाराजा साहेबांनी क्रोध, इर्षा, कृतघ्नता आणि मिथ्या अभिनिवेश या बाबींवर ‘ठाणांग सूत्र’ आगममध्ये सांगितलेल्या बाबींवर भाष्य केले. अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबीलिटी या दोन शब्दांची सुंदर फोड करून सांगण्यात आली. जिथे अधिकार आला तिथे जबाबदारी येते. जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे सांगून ज्या कुटुंबात प्रभावशाली विचार येत नाहीत ते कुटुंब कधीही प्रभावशाली बनत नाही. बोलणे किंवा खाणे असो रसनेवर नियंत्रण मिळविले तर सर्व बाबींवर नियंत्रण मिळविले असे समजा याविषयी विचारमंथन करून खुद्द आचार्य भगवंत श्रीमद् विजयरत्न सुंदरसुरीश्वरजी म.सा. यांनी उपस्थितांना प्रश्न विचारले ज्यांनी बरोबर उत्तर दिले त्यांना पुस्तक भेट दिले गेले. जैन हिल्स येथील निसर्गरम्य स्थळी शिबिरार्थींची व्यवस्था करण्यात आलेली आहे.