<
जळगाव दि. 13 ( जिमाका ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदान वाढीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून मतदानाच्या टक्केवारीवर त्या गावाला, नागरीभागातील सोसायटी, नगर अशा नागरी समुहांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य फलक लावले जाणार आहेत. समुहाचा बहुमान होत असेल तर मतदानवाढीसाठी सामुहिक प्रयत्न होऊ शकतात ही या संकल्पनेचा गाभा असून या उपक्रमाला विविध सामाजिक संघटना,सामाजिक कामात अग्रेसर असणारे व्यक्ति यांनी पुढे येऊन मतदानवाढीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
मतदान टक्का वाढविण्यासाठी नागरी सहभाग महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे. प्रत्येकाला आपलं गाव, आपली सोसायटी, आपलं नगर याचा नावलौकिक व्हावा असे वाटते. त्यासाठी मतदार सहभागाचा हा उपक्रम आगळावेगळा ठरणार आहे.
कसा असेल हा उपक्रम
नागरिकांनी मतदानाबद्दल अधिक सजग, जागृत होऊन मतदान करावे. तसेच मतदान करणे ही लोकशाहीतली अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे ही गोष्ट रूढ होण्यासाठी असे उपक्रम फलदायी ठरतील म्हणून ज्या वसाहती, गृहनिर्माण संस्था आणि गावं 76 ते 85 टक्के मतदान करतील त्यांना कांस्य रंगाचे फलक त्यांना अभिमानाचे प्रतीक वाटावेत अशा ठिकाणी उभे केले जातील, तर जिथे 86 ते 95 टक्के एवढे मतदान होईल अशा वसाहती, गृहनिर्माण संस्था, आणि गावात रौप्य फलक लावला जाईल आणि जिथे 96 ते 100 टक्के मतदान होईल अशा ठिकाणी चक्क सुवर्ण फलक लावला जाईल. हा उपक्रम केवळ व्यक्तिगत मतदानाला प्रोत्साहन देत नाही तर लोकशाही प्रक्रियेवर सामूहिक मालकीची भावना वाढवण्यासाठीही महत्वाचा ठरेल.
या उपक्रमाबद्दल गोल्ड सिटी रोटरी क्लबचे सदस्य अमित आहुजा यांच्या म्हणण्यानुसार असे फलक हे लोकशाही सहभागाचे चिरस्थायी प्रतीक म्हणून काम करतील. तसेच भविष्यात निवडून आलेल्या लोक प्रतिनिधींना नागरी सहभागातील परिसराची बांधिलकी दर्शविणारे पण ठरतील.
या उपक्रमाचा प्रभाव वाढविण्यासाठी, जिल्हा प्रशासनाने रोटरी क्लब, निवासी कल्याण संघटना आणि स्थानिक संस्थांसह विविध सामाजिक गटांकडून पाठिंबा मिळवला आहे. लोकशाही मूल्यवृद्धी करण्याच्या या भावनेला चालना देण्यासाठी आणि मतदानासाठी सामाजिक दबाव निर्माण करण्यासाठी “मी मतदान केले, आम्ही सर्वांनी मतदान केले” या घोषवाक्याखाली वॉकथॉन सारख्या समाज बांधणी उपक्रमांचे मोठया प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या आवाहनाला लायन्स क्लब, औद्योगिक संघटना, वैद्यकीय संघटना आणि अभियांत्रिकी संघटनांसह विविध संस्थांकडून पाठिंबा मिळत आहे.
जळगाव येथील रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी सार्वत्रिक सहभाग सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर देताना व्यक्तिगत पातळीवरील सहभागाचे महत्त्व तेवढेच महत्वाचे असल्याचे या उपक्रमाबद्दलचे मत व्यक्त केले.
अनेकांच्या बोलण्यातून हा उपक्रम मतदारांच्या सहभागासाठीचा हा अभिनव दृष्टीकोन शहरी मतदारांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण करण्याचे बळ देतो. या नाविन्यपूर्ण रचनेत एक व्यापक स्वारस्य निर्माण होऊ शकते आणि संपूर्ण जिल्ह्यात नागरी सहभाग वाढवण्यासाठी ब्लूप्रिंट म्हणून काम करू शकते.