<
जामनेर – (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभाग हे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कामकाज करणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर माता बाल संगोपन केंद्र व प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.मतदानाच्या दिवशी तालुक्यातील गरोदर माता,स्तनदा माता,दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
तालुक्यातील ३२७ मतदान केंद्रावर ३९६ अंगणवाडी सेविका,२७१ आशा स्वयंसेविका तसेच १२६ आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्याकडून मतदानाबाबत जनजगृती करून मतदानाचा टक्का वाढवण्याचे तसेच माता बालसंगोपन केंद्र व प्रथोपचार केंद्राचे काम करण्यात येणार आहे.
आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण तहसीलदार नानासाहेब आगळे,बालविकास प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे,नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्याकडून घेण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत,डॉ.दानिश खान,डॉ.नरेश पाटील,बालविकास प्रकल्प अधिकारी शीला पाटील,एस.एस सोनार ,भारती भिसे,निशा तेली सर्व गटप्रवर्तक,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
जामनेर तालुक्यात शहरी भागात ८४७ तर ग्रामीण भागात ५८७३ गरोदर मातांचे व शहरी भागात ८४८ स्तनदा माता तसेच ग्रामीण भागात ५१८४ स्तनदा मातांचे मतदान सकाळी ९ वाजेपर्यंत पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली.