<
जळगाव दि. ८ प्रतिनिधी – महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वनमाळी हॉलमध्ये दिनांक ४ते ६ मे दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन इरिगेशन सिस्टीम्सचा खेळाडू नईम अन्सारी विजयी ठरला आहे.
नईम अन्सारी याने राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विश्वविजेत्या प्रशांत मोरे चा क्वार्टर फाइनलमध्ये धक्कादायक पराभव केला. प्रशांत मोरे ने पहिला सेट २५-६ असा एकतर्फी जिंकला होता. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सेट नईमने अनुक्रमे २५-१७, २३-१८ असा जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. सेमी फाइनल मधे फ़हीम क़ाज़ी याचा २-१ असा पराभव करून अंतिम फेरीत नईम अन्सारीने प्रवेश केला. अंतिम सामन्यामध्ये जैन इरिगेशनचा अभिजीत त्रिपणकर (पुणे) याचा २/१ सेट ने पराभव करुन नईम ने राज्यमानांकन कॅरम स्पर्धेत विजेतेपद प्राप्त केले. महिला एकरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने रत्नागिरीच्या आकांक्षा कदम हीचा २-१ सेटने पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. नईम अन्सारी सैयद मोहसीन यांचे मार्गदर्शन लाभले.
नईम अन्सारी याच्या या विजयाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, जैन स्पोर्टस ॲकडमीचे अरविंद देशपांडे यांच्यासह जळगाव जिल्हा कॅरम असो. आणि जैन स्पोर्टस अकॅडमीच्या सहकाऱ्यांनी कौतूक केले आहे. राधेशाम कोगटा व मंज़ूर ख़ान यांनी अभिनंदन केले.