<
भिर मन निसर्गाशी एकरूप झालं की असंख्य सृजनसोहळे टिपता येतात असे सोहळे डोळ्यात साठवून ठेवणे हा तर अविस्मरणीय असा अनुभव ठरतो. भास आभासाच्या स्वच्छन्दी वृत्तीची आणि तरलतेची साक्ष देताना सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी एक आश्चर्यकारक प्रश्न विचारून मनाला पाखराची उपमा देतात.”मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मातआता होतं भुईवर गेलं गेलं आभायातं “पावसाबद्दल त्या म्हणतात…..”आला पहिला पाऊस,शिपडली भुई सारी धरतीचा परिमय, मह्य मन गेलं भरी” असंच हे मन नावाचं नातं वाऱ्यावर मातीचा अलोट सुगंध पसरवत त्या तालावर थिरकतं. मन लाटांमध्ये चिंब मन बुडणारे बिंब मन गर्द हिरवे रान मन बासरीची धून मन पावसाची चाहूल अशा बेधुंद पावसाच्या सरीत मन अधीर होते भिजायला ! घन निळे नभ बेधुंद गार वारा आर्तपणे साद घालतोय आणि माझं मन पोहोचलसुद्धा पावसाच्या बेधुंद करणाऱ्या वातावरणात चिंब भिजायला, भिजून मधहोश व्हायला, त्या समाधानात एक एक थेंब निथळताना आठवतोय.जमलंच तर काहीतरी मोजायला, काहीतरी अनुभवायला काहीतरी पाहायला, आठवणींच्या रेषांच्या कोशातून एखादे वलय निर्माण करायला. रिमझिम धून आभाळ भरून हरवले मनं येणारं हे कोण?अस सारख वाटत असतं. उधाण मन कुणाची वाट बघत? पावसात भिजला नाही असा माणूस नाही आणि पावसात रुजला नाही असा पाऊस नाही. पाऊस मनात रुजला की ओठांवर आपोआप ‘पाऊसगाणी’ येतात. तनाबरोबर मनालाही चिंब भिजवून टाकतात. आठवणींच्या तारावर ओळीनं बसलेले पाऊसथेंब जसे चकाकतात क्षणभर तसं मनातही चकाकतं. काहीतरी लख्ख स्वच्छ होतं सारं आणि पाऊसवेड्या मनाला मग फुटतात हिरवे धुमारे झडझडून कामाला लागतात काही हातं. चिंब भिजल्या क्षणांची स्वप्नेही जागी होती येता पाऊस शिरवे, मन विसरे जन रीती मन मोर थुई थुई, रम्य फुलवी पिसारा पावसाने भिजलेल्या मनाची अवस्था मन चिंब पावसाळी “येता पावसाच्या धारा, झोंबे अंगालाही वारा मन पाखरू बेधुंद, त्याला कितीही आवरा”
आपल्या प्रियेसोबत पर्जन्यधारांची मजा लुटणं म्हणजे पर्वणीच. अंगाला अंग बिलगून, हातात हात गुंफून आपल्याच विश्वात मशगुल असणाऱ्या युगुलावर कोसळणारा पाऊस म्हणजे अक्षतांचा वर्षाव होत आहे असा भास होतो. रेशमी मिठीत शहारल्या दिठीत परिसीमा गाठावी ती याच मनाच्या बेधुंद क्षणी आणि मग बोलक्या भावना स्वर जुळवू लागतात, साऱ्या देहाची सतार होते.पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत होते मन भिरभिरता पारवा होते मन गारठता गारवा होते मन थेंब थेंब होते. कधी कधी मन उधाण वाऱ्याचे मात्र बेचैन असते. पावसाची नको तितकी वाट बघायला लावते. “मनामध्ये झुरणारा, अश्रूंमधून झरणारा पाऊस माझा आकाशाकडे डोळे लावून शेतकऱ्यांना चातक बनवणारा पाऊस माझा”मग अशावेळी माझे सारे पावसाळे माझ्या मनातच भिजवून जातात. सखीच मन अलगदपणे शीतल वाऱ्यासवे जाऊन पोहोचते बेधुंद चिंब व्हायला,आणि मग प्रत्येकीच्या मनातला मनभावन श्रावण फुलतो झुलतो.श्रावणाचा गंध मनात असाच तनामनाला त्याच्या पोपटी कोवळ्या रूपाचा तजेला तनमनाला उल्हसित करतो. कधी हे मन या उधाण वाऱ्यालाच घाबरते.वार्धक्यात घराच्या बाहेरच पडत नाही,आणि जर पडलेच तर आपल्या काठीचा आणि छत्रीचा आहेच की आधार!कसे आहेत ना मनाचे पैलू! बालमनाची तर गोष्टच न्यारी.बेरकी मुलं भारीच हुशार! आईचा डोळा चुकवून पावसात गेलो तर आई रागवणारच!मग ती लब्बाड बाळ शक्कल लढवतात आणि आईचा हात धरून आईलाच म्हणतात “टपटप” बाहेर काय पडतंय ते पाहू चल ग…आई चल ग…. आई पावसात जाऊ. आता आईलाच पावसात घेऊन गेल्यावर आई कोणाला रागावणार? असे हे उधाण वाऱ्याप्रमाणे मन वेगवेगळाली रूपे घेऊन प्रत्येकाच्या मनात सुखेनैव नांदत असते.
श्रीमती ज्योती राणे शिक्षिका- साळवा, ता. धरणगांव जि. जळगांव