<
जळगाव-(जिमाका) – रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे गेल्या आठवड्यात गॅस्ट्रोची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही खेड्यावर वाघोद्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासन यांनी संयुक्तिकरित्या प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात सूक्ष्मकृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी गुरुवार दिनांक 30 रोजी रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी रावेर पंचायत समिती येथे आयोजित बैठकीत श्री अंकित हे बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रकल्प संचालक गणेश भोगावडे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोसोदे, रावेरच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री अंकित यांनी मोठे वाघोदे येथे सुरू असलेल्या जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाची यावेळी पाहणी केली. तसेच गॅस्ट्रो संशयित रुग्ण आढळून आलेल्या भागाची पाहणी करून स्वच्छता विषयक सूचना केल्या. यावेळी गावातील सर्व नाले तसेच, गटारी यांची साफसफाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले. वापराच्या व पिण्याच्या पाण्यात जास्त ब्लिचिंग पावडरचा वापर करावा. तसेच गावातील अवैध नळ कनेक्शन तात्काळ काढून घेणे, जलसुरक्षक अथवा पाणीपुरवठा कर्मचारी यांना टी सी एल चा योग्य वापर करणे बाबत सूचित करणे आणि पाणीपुरवठा करण्यापूर्वी तपासणी करूनच पाणी सोडणे, गटारी/नाले तात्काळ पावसाळा सुरू होण्यापूर्वी साफ करून घेणे,गटारी लगत जे नळ कनेक्शन असतील त्यांची पाहणी करून दूषित पाणी त्यात जात नाही याची खात्री करून घेणे,
गावांमध्ये उकिरडे मोठ्या प्रमाणात आहे पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी साचून तो कचरा कुजून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे तात्काळ उकिरडे उचलण्याची व्यवस्था करावी, गावात पाणीपुरवठा पाईपलाईन मध्ये लिकेज असतील तर ते तात्काळ काढून घेणे, सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था आणि साफसफाई राहील याची दक्षता घेणे, कचरा गाडी संपूर्ण गावात फिरवून कचऱ्याचे योग्य संकलन करून विल्हेवाट लावणे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली पाहिजे याची दवंडी द्वारे सूचना देणे तसेच आठवड्यातील एक दिवस सक्तीने ड्राय डे पाळणे ,पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी गावातील ज्या ज्या ठिकाणी पाणी साचून राहते त्या ठिकाणी खोलीकरण करणे अथवा गाळ उपसणे किंवा इतर आवश्यकतेनुसार पावसाळ्यापूर्वीच तात्काळ कार्यवाही करून घ्यावी.अशा सूचना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित यांनी या वेळी दिल्या.
सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश…
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे उद्भवलेल्या परिस्थिती सारखी परिस्थिती जिल्ह्यातील इतर कोणत्याही गावात उद्भवू नये. तसेच आगामी काळातील पावसाळा लक्षात घेऊन मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाच्या माध्यमातून सूक्ष्म आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील यावेळी दिले. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारे संभाव्य जलजन्य व कीटकजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यात येऊन ग्रामस्थ व नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश देखील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी यावेळी दिले.
गेल्या चार दिवसात एकही नवीन रुग्ण नाही…
रावेर तालुक्यातील मोठे वाघोदे येथे गेल्या आठवड्यात गॅस्ट्रोची लागण झाली होती. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांवर तसेच गॅस्ट्रो संदर्भातील लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून गेल्या चार दिवसात वाघोदा येथे एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. त्यासोबतच वाघोदा येथे आरोग्य विभागाच्या चार पथकांमार्फत ज्या भागात गॅस्ट्रोची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते तेथे सर्वेक्षण करण्यात येत असून घरोघरी जाऊन स्वच्छतेबाबत तसेच आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
पाण्याचे शद्धीकरण
गुरुवार दिनांक 30 रोजी जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग तसेच पाणी व स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून वाघोदा येथे पिण्याचे व वापराच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले. तसेच परिसरातील स्वच्छतेबाबत देखील ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. गाव व परिसरातील इतरत्र भागात संपूर्णपणे स्वच्छता करून काळजी घेण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
आशा स्वयंसेविकांमार्फत सर्वेक्षण सुरू
वाघोदा येथे आशा स्वयंसेविकांमार्फत संपूर्ण गावात सर्वेक्षण करण्यात येत आहे. ग्रामस्थांमध्ये गॅस्ट्रो तसेच इतर आजाराशी संबंधित कोणती लक्षणे आढळून येत आहेत काय किंवा काही त्रास जाणवत असल्याबाबत आशा स्वयंसेविका माहिती जाणून घेत आहेत. या संदर्भातील अहवाल दररोज आरोग्य विभागाला पाठवण्यात येत आहे. त्यासोबतच औषधी तसेच ओ आर एस चा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला असून ओ आर एस कसे तयार करावे या संदर्भात प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे.
डॉ. इंद्राणी प्रसाद करणार मार्गदर्शन
वाघोदा येथे गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर संशयित रुग्णांचे सॅम्पल आरोग्य विभागामार्फत घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यात काही रुग्णांना कॉलराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर कॉलरा आजारावरील उपचार पद्धती व घ्यावयाची काळजी यासंदर्भात आज दिनांक 31 मे शुक्रवार रोजी डॉ. इंद्राणी प्रसाद या जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन वर्गास जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिले आहेत.