जळगाव, दि. 14 (जिमाका वृत्तसेवा) :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वषी अनुसूचित जाती, प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना ( मुला-मुलीना) परदेशामध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची अत्यंत महत्वाची योजना असून सन 2003 पासून राबविली जात आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) अध्यापन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सदर करण्याची अंतिम मुदत दिनांक 12 जुलै 2024 पर्यंत आहे.
सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्ययावत ( Qx World University Ranking) 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी 30% जागावर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा.
सदर परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक ते कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय ३. चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११००१ या पत्यावर सादर करावा.
सदर योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल, भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी सकेतस्थळास भेट द्यावी. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्यण योगेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.