<
जळगांव-(चेतन निंबोळकर)- शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत होऊन चिंता व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी असलेली अस्वच्छता, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, महापालिकेचा हलगर्जीपणा, श्वानप्रेमी यामुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला जळगांवकरांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडूनही पालिकेकडून फारशी कारवाई झाल्याचे दिसत नाही. गल्लोगल्ली टोळ्याटोळ्यांनी फिरणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या या कुत्र्यांच्या समस्येबद्दल नागरिकांनी तक्रार करूनही वेळीच प्रशासनाने दखल न घेतल्याने या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांचा शहरात वावर वाढलाय. रस्तोरस्ती व गल्लोगल्लीत मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, नागरिकांवर धावून जाणे, रस्त्यावरच जोरजोरात भुंकणे यामुळे नागरिकांमध्ये कुत्र्यांची दहशत पसरली आहे. कुत्र्यांची वाढलेली संख्या ही केवळ डोकेदुखीच नाही तर भयावह वाटणारी बाब ठरू लागली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रस्त्यावर कसेही आणि कुठेही वेगाने पळणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून ते गंभीर जखमी झाल्याच्या अनेक घटना शहरात घडलेल्या आहेत. अस्वच्छ परिसरात कुत्र्यांना सहज खाद्य उपलब्ध होते.कचरा आणि अस्वच्छता यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. रस्त्यावर कुठेही टाकण्यात येणार कचरा, त्यातील पदार्थ, मासांचे तुकडे, हाडे यांच्यामुळे कुत्र्यांना आयते खाद्य उपलब्ध होत असल्याने शहर परिसरात कुठेही कुत्रे नजरेस पडत असतात. शहरात रस्त्यावर होणारी मांस विक्री, हॉस्टेल, हॉटेल आणि घरगुती शिळ्या अन्नपदार्थांची नागरिक व व्यावसायिक आजूबाजूच्या परिसरात विल्हेवाट लावतात. त्यामुळे कुत्र्यांनादेखील अन्नाच्या शोधात भटकंती करावी लागत नाही.शहरातील सर्व परिसराचा विचार केल्यास मोकाट कुत्र्यांची संख्या हजाराच्यावर भरेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.शहरातील बहुतांशी भागात नॉनव्हेज खाद्यपदार्थ मिळणारी हॉटेल्स आहेत. दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी रस्त्याने मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उघड्यावर होणारी मांसाची विक्री आणि काही हॉटेलच्या आजूबाजूची अस्वच्छता यांच्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. महापालिकेने अशा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे अधिकाऱ्यांना सांगूनही त्यावर उपाययोजना केल्या नाहीत असे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुले, वयोवृध्द नागरिकांना घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे.
सकाळी ६ ते १० आणि रात्रीच्या वेळी या मोकाट कुत्र्यांचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.