जळगाव – (प्रतिनिधी) – येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि निमजाय फाऊंडेशन जळगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने क्षेत्रकार्य संस्था तरसोद ग्रामपंचायत येथील उज्वल महिला ग्राम संघातील महिलांना ‘शिवणकला आणि सौंदर्य साधना’ हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या विशेष उपक्रमासाठी मागील वर्षी क्षेत्रकार्य संस्थेत महाविद्यालयाच्या क्षेत्रकार्य मध्यस्थीने निमजाय फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. शितल पाटील यांच्या तर्फे उज्वल महिला ग्राम संघातील ३०० महिलांना आवाहन करण्यात आले होते. समुदाय संसाधन व्यक्ती सुरेखा पाटील , हर्षलता ब-हाटे , पशु सखी निता पाटील यांच्या समन्वयातून ६० महिलांची नोंदणी महाविद्यालयाच्या मध्यस्थीने केली होती.
सप्टेंबर महिन्यातील प्रथम सप्ताहात या कार्यक्रमाचे उद्घाटन तरसोद गावातील महिला ग्राम संघात होण्याचे संकेत तरसोद ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री. नरेंद्र साहेबराव साळुंखे यांनी आज ग्रामपंचायतच्या मासिक सभेत दिले. या साठी गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.
तसेच आज व उद्या क्षेत्रकार्यांतंर्गत कौटुंबिक हिंसाचारापासुन महिला संरक्षण कायदा २००५ चे माहिती पत्रकाद्वारे गावातील महिलांना या कायद्याचा प्रचार व प्रसार क्षेत्रकार्य विद्यार्थी अस्मिता भोये, जयश्री पाटील, रुपाली पाटील, चेतन पाडवी , सागर पवार , अनवर फकिर , रमजान तडवी गावात करणार आहे. या विशेष उपक्रमांची मुळ संकल्पना बी. एस. डब्ल्यु. क्षेत्रकार्य समन्वयक डॉ. निलेश शांताराम चौधरी, क्षेत्रकार्य मार्गदर्शक डॉ. सुनिता चौधरी, डॉ. जुगल घुगे यांची होती. यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.