<
जळगाव – (प्रतिनिधी) – मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी तर्फे गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘ कर्तव्याच्या ठिकाणी मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर ध्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आनंदयात्री योग हॉल, मनभावन संकुल या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यशाळेमध्ये उपस्थित विद्यार्थी आणि योग साधकांना योगाचार्य डॉ. देवानंद सोनार यांनी मार्गदर्शन करून ध्यान प्रात्यक्षिकाचा अभ्यास करून घेतला.
कर्तव्याच्या ठिकाणी असताना मानसिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत, ताण तणावाचे आणि चिंतेचे विषय कसे ओळखावेत, आणि त्यावर काय उपाय योजना करावी या दृष्टिकोनातून डॉ. देवानंद सोनार यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले आणि सविकल्प ध्यानाचे प्रात्यक्षिक सुद्धा उपस्थितांकडून करून घेतले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन आणि आभार प्रा. ज्योती वाघ यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रा. पंकज खाजबागे, प्रा. श्रद्धा व्यास, प्रा. सोनल महाजन, प्रा. अनंत महाजन यांनी परिश्रम घेतले. एम. ए. योगिक सायन्स, बी. ए. योगिक सायन्स, योगशिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि योगसाधक यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला.