<
जळगाव (प्रतिनिधी) – संस्थेच्या शासकीय अनुदानित विद्यालयात शिपाई पदावर भाच्याला लावण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी करून त्यातील २ लाख रुपये तक्रारदाराकडून स्वीकारताना एरंडोल येथील संस्थेच्या सचिवाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांचा मुलगा हा धरणगाव तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील वेदमाता गायत्री बहुउद्देशीय संस्थेमध्ये शासकीय अनुदानित आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय भोद खुर्द येथे शिपाई या रिक्त पदावर नोकरीला होता. (केसीएन) त्यावेळेला संशयित आरोपी वेदमाता संस्थेचे सचिव विनोद मधुकर चौधरी (वय ५३, रा. शिव कॉलनी, जळगाव) यांनी मुलाला शिपाई पदावर लावण्यासाठी ७ लाख ७० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर तक्रारदारांच्या मुलाला सचिव विनोद चौधरी यांनी मुलाचे वय २०१२ पासून फरक काढण्यासाठी कमी असल्याचे सांगत शिपाई पदावरून गेल्या महिन्यात कमी केले होते.
सदरची जागा ही २०१२ पासून रिक्त दाखवली होती. तसेच तक्रारदारांचा भाचा राजेश याला या रिक्त पदावर नोकरी लावण्यासाठी तसेच शासनाकडून मंजुरी आणून देण्यासाठी दि. १५ ऑक्टोबर रोजी सचिव विनोद चौधरी यांनी तक्रारदार कडे १० लाख रुपये मागितले.(केसीएन) यात तात्काळ २ लाख रुपये, शासनाकडून मंजुरी प्राप्त झाल्यावर ३ लाख रुपये आणि पहिला पगार होईल तेव्हा ५ लाख रुपये अशी मागणी केली. तसेच पूर्वी स्वीकारलेले ७ लाख ७० हजार विसरून जा म्हणून सांगितले.
सदर १० लाख मधील २ लाख रुपये हा पहिला हप्ता तक्रारदाराकडून स्वीकारताना गुरुवार दि. १७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मार्गदर्शनाखाली सचिव विनोद चौधरी यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक सुनील वानखेडे, प्रणय ठाकूर, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, बाळू मराठे, किशोर महाजन, प्रदीप पोळ, राकेश दुसाने यांनी केली आहे. संशयित आरोपी सचिव विनोद चौधरी याच्यावर रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.