<
जळगाव – (प्रतिनिधी) – झालेल्या विविध विकास कामांचे बिल अदा करण्यासाठी आणि दुसऱ्या गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागितली म्हणून पारोळा येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच गटविकास अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे दुसऱ्या विस्तार अधिकाऱ्यासह, वरिष्ठ लिपिक, सहायक कार्यक्रम अधिकारी यांच्यावरही पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावने हि कारवाई आज दि. २३ रोजी केली आहे.
३३ वर्षीय तक्रारदार यांनी दलीत वस्ती सुधार योजनेअंतर्गत पारोळा तालुक्यातील सावखेडा होळ गावी पेव्हर ब्लॉक बसविणे व काँक्रिट रस्ता बनवण्याचे ७ लाखांचे व सावखेडा तुर्क गावातील रस्त्यांचे खडीकरण करण्याचे ६० लाखांचे ३ कामे तसेच शासनाच्या ९०- १० हेडखाली ३० लाखांचे ३ अशी एकूण ९० लाखाचे ६ कामे घेतली होती. (केसीएन) त्यापैकी सावखेडा होळ गावात केलेल्या कामांचे उर्वरित पैशाचे बिल व सावखेडा तुर्क गावात घेतलेल्या कामांची वर्क ऑर्डर काढून देण्याचे मोबदल्यात गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे (वय ५६, रा. मानराज पार्क, जळगाव) यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपये लाच रकमेची मागणी केली होती.
त्यावेळी विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (वय ५८, रा. मुक्ताईनगर, जळगाव) यांनी तक्रारदाराला २ लाख रुपये लाच रकमेपैकी ५० टक्के प्रमाणे १ लाख रुपये
लाच रक्कम ऍडजस्ट करून सदर लाच रक्कम गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांना देण्यास प्रोत्साहन देऊन लाच मागणीस समर्थन दिले. तसेच विस्तार अधिकारी गणेश प्रभाकर पाटील (वय ५०, रा.मानसिंगका नगर, पाचोरा), वरिष्ठ लिपिक अतुल पंढरीनाथ पाटील (वय ३७, रा. मोंढाळे प्र. अ. ता. पारोळा), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील (वय ३७, रा. गुलमोहर बाग, पारोळा) यांनीसुद्धा तक्रारदाराकडे स्वतः साठी व गटविकास अधिकारी शिंदे यांचे लाच मागणी प्रमाणे त्यांचे करिता २ टक्के प्रमाने २ लाख रुपये लाच रक्कम देण्यास प्रोत्साहन दिले म्हणून त्यांच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
यात विस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी योगेश साहेबराव पाटील यांना नमूद गटविकास अधिकारी यांच्यासाठी वर्क ऑर्डर काढून देतो म्हणून १ लाखाची लाच मागणी व स्वीकार केलेबाबत दि. २० सप्टेंबर रोजी पारोळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. सदरचे गुन्ह्यात दोन्ही जामीनावर मुक्त आहेत. सदरची कारवाई उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पीएसआय दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांनी कारवाई केली आहे.