<
जळगांव(चेतन निंबोळकर)- शहरातील मेहरूण (तांबापुर) भागात विजेच्या खांबावर प्रखर झोत दिवे बसविण्यात आले आहे. हे दिवे २४ तास आपली सेवा देत असून ते बंद कोणी आणि कसे करायचे याचे कोणतेही व्यवस्थापन नसल्याचे चित्र या भागात दिसत आहे. तांबापूर भागात सलग २४तास दिवे सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. राज्यात विजेसाठी नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. मात्र जळगांव शहर महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरातील पथदिवे सुरूच आहेत. नगरपालिकेला याकडे पाहण्यास वेळ नसून या विजेचा अपव्यय सुरू असून त्याचे बिल मात्र पालिकेच्या तिजोरीतून भरावे लागत आहे. महावितरण विभागाचे आपल्या कामात लक्ष नसल्यामुळे शहरातील पथदिवे सुरुच राहुन भरदिवसा विजेचा शेकडो युनिटचा अपव्यय सुरू आहे.
याकडे पालिकेचे कर्मचारी लक्ष देत नाहीत. या विजेचा भुर्दंड पालिकेच्या तिजोरीवर बसणार असून पर्यायाने ही रक्कम जनतेच्या खिश्यालाच भुर्दंड ठरणार आहे. पण महावितरण विभाग भरदिवसा झोपेचे सोंग घेत असल्या कारणाने सदर पथदिवे सुरूच राहत आहेत. त्यामुळे अधिक विजेची नासाडी होत आहे. तसेच महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी या होणार्या नुकसानीकडे गांर्भीयाने पाहत नाहीत. महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी याबाबत गंभीर नसल्याकारणाने शहरातील पाणी, दिवाबत्ती, नालीसफाई, रस्ते आदी महत्त्वाच्या प्राथमिक गरजा पुर्णपणे कोलमडुन गेल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. याबाबत कुणाकडे तक्रार करायची या संभ्रमात आहेत. शहरातील विजपुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा हया झाडाच्या फादयांनी वेढल्या गेल्यामुळे वाऱ्यानेही शहरातील मुख्य रस्त्यावरील विजपुरवठा अनेकदा खंडीत होत आहे याकडे महावितरण विभाग गांभीर्याने पाहत नसल्यामुळे नागरीकांना अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महावितरण विभागाला जाग कधी येणार? याकडे लक्ष लागून आहे.