<
जळगाव – (प्रतिनिधी) – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन स्पोर्टस अॅकडमी यांच्या सहकार्यातून दि. ८ ते १० नोव्हेंबर असा तीन दिवस हा सेमिनार राहणार आहे.
जैन हिल्सच्या सुबिर बोस हॉल येथे सुरू असलेल्या सेमिनारमध्ये अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे केरळचे आंतरराष्ट्रीय पंच व जागतिक शिस्त पालन समितीचे सदस्य एम. एस. गोपाकुमार यांची विशेष मार्गदर्शनासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनात बुद्धिबळ विषयातील विविध नियम, नियमावली यावर मुख्यत्वे करुन प्रकाश टाकण्यात येणार आहे. संपूर्ण भारतातून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, सौराष्ट्र, बिहार, दिल्ली राज्यातून निवडक असे २२ राष्ट्रीय बुद्धिबळ पंचाची निवड महासंघाद्वारे या सेमिनारसाठी केली आहे. फिडे मानांकन प्राप्त करण्यासाठी सेमिनार महत्त्वपूर्ण आहे. सेमिनार मध्ये सहभागी राष्ट्रीय बुद्धिबळ पंचाची समारोपाच्या दिवशी परिक्षा घेण्यात येईल, यात यशस्वी पंचांना फिडे पंच असे मानांकन देण्यात येईल. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनचे सचिव नंदलाल गादिया, खजिनदार अरविंद देशपांडे, सहसचिव संजय पाटील, सदस्य रवींद्र धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच प्रविण ठाकरे यांच्यासह जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस अॅकडमीच्या सहकारी यशस्वीतेसाठी सहकार्य करत आहेत.