<
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित शांतीयात्रेत जळगावकरांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव दि. 2 (प्रतिनिधी) – महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे काढण्यात आलेल्या ‘अहिंसा सद् भावना शांतीयात्रेत’ जळगावकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भव्य असलेल्या यात्रेतुन बंधुत्वता, त्याग, समर्पण, सत्य, अहिंसासह गांधीजींच्या तत्वांचा-विचारांचा संदेश दिला गेला. विद्यार्थ्यांनी विविध घोषणांद्वारे गांधीजींनी दिलेल्या संस्कारावर चालण्याचा संकल्पही यात्रेद्वारे केला.
‘विश्व अहिंसा दिन’, चरखा दिन आणि बा-बापू 150 जयंती वर्षनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे काढण्यात आलेल्या अहिंसा सद् भावना शांती यात्रेची सुरवात सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, मनपा इमारतपासून झाली. या शांती यात्रेस आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अणू शास्त्रज्ञ तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषद सीईओ डॉ. बी. एन. पाटील, जळगाव महानगर पालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त दलिचंदजी ओसवाल, अशोक जैन, ज्योती जैन यांच्यासह जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. सुभाष चौधरी, जैन फार्मफ्रेश फूडसचे संचालक अथांग जैन, अभेद्य जैन, यांच्यासह जैन परिवारातील सदस्य व सहकारी उपस्थितीत होते. बा-बापूंच्या वेशभुषेसह, विविध घोषणा, प्रेरणादायी गांधी विचारांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांसह जळगावकरांनी यात्रेत सहभाग घेतला. यात्रा नेहरू पुतळा, कोर्ट चौक मार्गे जावून नविन बसस्थानकाशेजारील महात्मा गांधी उद्यानामध्ये यात्रेचा समारोप कस्तुरबा गांधी, महात्मा गांधी, लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून झाला.
बा-बापूंच्या वेशभुषेत चिमुकले
शांतीयात्रेत शहरातील अनुभुति इंटरनॅशनल रेसिडेंशियल स्कुल, अनुभूती इंग्लिश मीडीयम स्कूल व सेंकडरी स्कूल, ओरियन स्टेट बोर्ड इंग्लिश मीडीयम स्कूल, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, जि. प. विद्यानिकेतन, ला. ना. सार्वजनिक विद्यालय, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पी. जी. डीप्लोमामधील विद्यार्थी यासह शहरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बा-बापुच्या वेशभुषेत अनेक विद्यार्थी होते. ‘जय जवान, जय किसान’ यासह गांधीजींच्या प्रेरणादायी विचारांच्या घोषणा विद्यार्थी देत होते.
बैलगाडीवर सुतकताई
गांधीजींना आवडणारी भजने, ट्रॅक्टरवर चित्ररथ यासह बैलगाडीवर गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी सुरेश पाटील हे सावली चरखाने सुतकताई करीत होते. चरखा जयंतीच्या औचित्याने चरख्यावर त्यांनी अखंड सुतकताई केली. स्वावलंबनाच्या दृष्टीने गांधीजींचे प्रयत्नांवर यातून प्रकाश टाकण्यात आला.
विदेशी नागरीकांसह 14 राज्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग
गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजीत नॅशनल गांधीयन लीडरशीप कॅम्पमध्ये नेपाळसह 14 राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी त्या-त्या राज्यांच्या पारंपारिक वेशभूषसह शांती यात्रेत सहभाग घेतला. सोबत जर्मनी येथील अभ्यासकांनीसुद्धा यात्रेत सहभाग घेतला.