<
जळगाव – (प्रतिनिधी) – भारतीय अभिजात संगीताचा व ‘खान्देशच्या रसिकांच्या सांस्कृतिक कक्षा रुंदावणारा महोत्सव’ म्हणून नावारूपास आलेल्या ‘बालगंधर्व संगीत महोत्सवाचे’ आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २३ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव जनता सहकारी बँक, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, सुहान्स केमिकल्स प्रा. लि., जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रा. लि. होस्टिंग ड्युटी अर्थात चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. व संस्कृती मंत्रालय, भारत सरकार हे आहेत.
भारतीय अभिजात संगीताच्या विश्वात जळगावचे नाव अधोरेखित करणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानाने निमंत्रित करण्यात आलेले आहे.
महोत्सवाची सुरुवात दि. ३ जानेवारी रोजी होणार असून उदघाटन समारंभा नंतर प्रथम सत्रात बेंगलोर येथील प्रतिथयश भगिनी रेश्मा भट व रमैया भट यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यांना संवादिनीवर अभिनव रवंदे तर तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर साथसंगत करतील. द्वितीय सत्र जुगलबंदीने सादर होणार आहे. यामध्ये कोलकाता येथील भाऊ व बहीण बासरी व गायनाची जुगलबंदी सादर करतील. केवळ १५ वर्षांचा अनिरबन रॉय व त्याची बहिण मैत्रेयी रॉय हे ते दोन कलावंत, सन २०२२ मध्ये कलर्स टिव्ही वरील गाजलेला रीऍलिटी शो ‘होनरबाज देश कि शान’ मधील आपल्या सादरीकरणाने अनिरबनने संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले होत. त्यांना तबल्याची साथ कोलकात्याची रींपा शिवा करणार आहे.
महोत्सवाचे द्वितीय दिनाचे प्रथम सत्र बेंगलोरचाच एक तरूण, उमदा व आश्वासक गायक अनिरुध्द ऐटल सादर करणार आहे. ते शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना संवादिनीवर अभिनव रवंदे तर तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर साथसंगत करतील. द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र दिल्ली येथील प्रख्यात नृत्यांगना, अभिनेत्री, व पं. बिरजू महाराजांची नात शिंजीनी कुलकर्णी कथक नृत्य सादर करतील त्यांना तबल्याची साथ योगेश गंगाणी, संवादिनी गायन साथ सामी उल्हाह खान, पढंतची साथ अश्विनी सोनी, तसेच सतार ची साथ पंडिता प्राजक्ता गुर्जर करतील.
तृतीय दिनाचे प्रथम सत्र ‘तबला क्वीन’ या उपादीने सन्मानित झालेल्या कोलकत्याची तरूण तबला वादक रींपा शिव आपल्या एकल तबला वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील. रींपा यांना संवादिनीवर नगम्याची साथ अभिषेक रवंदे करतील.
समारोपाच्या सत्रात तरुण पिढिचे प्रतिनिधित्व करून भारतीय अभिजात संगीताची धुरा पुढे नेणारे पती पत्नी ज्यांच्या घराण्यातच अभिजात संगीताचे संस्कार होत आलेले आहेत जे देश विदेशात आपली कला सादर करून रसिकांना रीझवित आहेत असे नंदिनी शंकर (व्हायोलिन) व महेश राघवन (जिओ श्रेड) या वाद्यावर जुगलबंदी सादर करणार आहेत. त्यांना तबल्याची साथ प्रख्यात तबला वादक तनय रेगे करणार आहेत.
२३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची यावर्षीची सुसंवादिनी असणार आहे ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली उत्तम अभिनेत्री, कथक व गायनात विशारद असलेली, झी मराठी वरील ‘महाराष्ट्राची सुपरस्टार’ फायनालिस्ट व युवक महोत्सवातील सुवर्ण पदक विजेती जुई भागवत.
तरुण पिढीने व जुन्या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व या महोत्सवाच्या विविध प्रायोजकांनी केले आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल, तरी रसिकांनी वेळेवर उपस्थित रहावे अशी विनंती देखील पत्रकार परिषदेत आयोजकांनी केली आहे.
प्रवेशिकेसाठी सौ. दीपिका चांदोरकर यांच्याशी मोबाईल क्र. ९८२३०७७२७७ यांच्याशी संपर्क करावा अशी विनंती प्रतिष्ठानाने केली आहे.